पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

सामना ऑनलाईन । मुंबई

केईएम रुग्णालयातील डायलिसिस विभागातील फॉल्स सिलिंगच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर आता पालिकेच्या सर्वच रुग्णालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. अशा दुर्घटना होऊन रुग्णालयातील कर्मचारी व रुग्णांच्या जिवाला धोका होऊ नये म्हणून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी शिवसेनेने केली होती. केईएममध्ये १४ मार्चला रात्री डायलिसिस विभागातील फॉल्स सिलिंगवरील स्लॅबचे प्लास्टर कोसळून दोन रुग्ण जखमी झाले होते.

या दुर्घटनेनंतर केईएमच्या सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा अशी मागणी प्रभाग समिती अध्यक्ष सचिन पडवळ यांनी केली होती. केईएमच्या आवारात रोज रुग्ण आणि नातेवाईकांचा, कर्मचाऱ्यांचा राबता असतो. त्यामुळे आवारातील सगळय़ा इमारतींचेच स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे अशी मागणी पडवळ यांनी अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांना पत्र लिहून केली.

पालिकेच्या नायर, शीव, केईएम या तिन्ही प्रमुख रुग्णालयांचे २०१४ मध्ये स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे, मात्र आता पुन्हा एकदा स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले जाणार आहे. त्याकरिता वरिष्ठ अभियंत्यांची टीम तयार करण्यात आली आहे.
-डॉ. अविनाश सुपे, संचालक, प्रमुख रुग्णालये

अभियंत्यांची टीम तयार करा
शिवसेनेच्या मागणीची दखल घेऊन अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी पालिकेच्या सर्वच प्रमुख रुग्णालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाला आणि आरोग्य विभागाच्या उपायुक्तांना दिले आहेत. अभियंत्यांची टीम तयार करून रुग्णालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असेही आदेश त्यांनी ‘दले आहेत.