
दक्षिण-मध्य मुंबईतील एमएमआरडीए वसाहतींची दुरवस्था झाली असून त्यात राहणारे शेकडो रहिवासी हवालदिल झाले आहेत. यासंदर्भात शिवसेनेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर या वसाहतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे तसेच इमारतींच्या मुख्य दुरुस्तीची कामे करण्याचे आश्वासन एमएमआरडीए आयुक्तांनी दिले आहे.
दक्षिण-मध्य मुंबईतील प्रकल्पग्रस्तांसाठी बांधण्यात आलेल्या शेकडो इमारतीची मुख्य दुरुस्तीची कामे न झाल्याने या इमारतीमध्ये राहणारे हजारो नागरिक हवालदिल झाले आहेत. बंद पडलेले एसटीपी प्लाण्ट, मोठय़ा प्रमाणात होणारी गळती थांबवणे, विद्युत कामे, स्ट्रक्चरल ऑडिटसहित मुख्य दुरुस्तीची कामे याबाबत शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांनी सातत्याने एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अनेक कामे मार्गी लागण्याच्या दृष्टीने प्रशासकीय प्रस्ताव तयार आहेत. सर्वच इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार नाही, अशी माहिती पुढे आल्याने रहिवासी चिंतेत होते. रहिवाशांच्या विविध प्रश्नांसंदर्भात शिवसेनेच्या शिष्टमंडळाची एमएमआरडीएसोबत बैठक झाली. या बैठकीत एमएमआरडीए आयुक्तांनी स्ट्रक्चरल ऑडिटसहित कामे करणार असल्याची ग्वाही दिली. या बैठकीला विभागप्रमुख प्रमोद शिंदे, माजी नगरसेविका निधी शिंदे, शाखाप्रमुख संजय कदम, गणेश पाटील, किरण सावंत, शाखा संघटक दक्षता पाताडे, प्रकाश जाधव, अमोल कोकरे, विजय सागवेकर, रवी जगधाने, सचिन साठे, इस्माईल खान, उर्मिला लोखंडे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र नगर, चिता कॅम्प व अणुशक्ती नगरमधील तरुणांना मेट्रो प्रकल्पात नोकरी द्या
व्हिडीओकॉन अतिथी येथील प्रभाग क्र. 148 मधील विभागांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीची पुनर्बांधणी, नागाबाबा नगर गणेश मंदिराची पुनर्बांधणी, महाराष्ट्र नगर, चिता पॅम्प व चेंबूर अणुशक्ती नगर येथील तरुणांना मेट्रो प्रकल्पात नोकरी मिळण्यासाठी प्राधान्य देणे, चिता पॅम्प, कोरबा मिठागर, वाशी नाका, मुपुंद नगर, पांजरपोळ, भक्तीपार्क येथील अतिखराब झालेल्या इमारतींची दुरुस्तीची कामे प्राधान्याने घेणे अशा विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली. त्याला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.



























































