मॅडमिशन-ऑनलाइन प्रवेशअर्जासाठी आज शेवटची संधी

19

सामना ऑनलाईन, मुंबई

अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी उपलब्ध जागा आणि अर्जदार विद्यार्थ्यांची आतापर्यंतची संख्या पाहता यंदा अकरावीच्या प्रत्येक जागेसाठी चुरस पहायला मिळणार आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी एक लाख ५९ हजार ६८२ जागा उपलब्ध आहेत. मात्र तब्बल दोन लाख १५ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले असून उद्या शेवटच्या दिवसापर्यंत ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

  • ३० जूनला सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होईल. या यादीत विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेतील आपला प्रतीक्षा क्रमांक समजेल.
  • त्यानंतर ७ जुलैला सायंकाळी ५ वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
  • उद्या २७ जून सायंकाळी ५ पर्यंत विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरू शकतात.

गेल्या वर्षीपेक्षा यंदा अर्जांची संख्या निश्चित वाढेल, असे शिक्षण उपसंचालक बी. बी.चव्हाण यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षीपेक्षा सुमारे सहा हजार जागा यंदा वाढल्या आहेत. त्यातच कोटय़ातील प्रवेशानंतर रिक्त राहिलेल्या जागाही ऑनलाइन प्रवेशासाठी खुल्या केल्या जातात. ऑनलाइन प्रवेशाच्या जागांमध्ये भरच पडणार असल्याने एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

अनेक विद्यार्थी आधी अल्पसंख्यांक, इनहाऊस, मॅनेजमेंट कोट्याद्वारे कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन ठेवतात. हे विद्यार्थी ऑनलाइन प्रवेशातही अर्ज करून अधिक चांगल्या कॉलेजसाठी नशीब आजमवतात. यंदा कोटय़ातून प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांना ऑनलाइनच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळणार नसल्याने गुणवत्ता यादीनंतर विद्यार्थी संख्येचा फुगवटा कमी होईल.

आपली प्रतिक्रिया द्या