खोल दरी, काळीज भेदणारा अंधार…, आंबेनळीच्या जिगरबाज मावळ्यांची २८ तास झुंज

शैलेश पालकर, पोलादपूर

८०० फुटांची दुर्गम दरी… प्रचंड धुके, पावसाचा मारा आणि कान बधिर करणारा भणभणणारा वारा… अशा जीवन आणि मृत्यूच्या मध्येच दोरीवर लोंबकळत मृतदेह पाठीवर घेऊन बचावकार्य करणारे सह्याद्री ट्रेकर्स, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि महाड, पोलादपुरातील स्थानिक तरुणांची टीम शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून रविवारी दुपारी ३ वाजेपर्यंत दिवसरात्रीची पर्वा न करता तब्बल २८ तास जिवावर उदार होऊन या आंबेनळीच्या शिलेदारांनी एनडीआरएफ जवानांच्या मदतीने ५०० फूट दरीतून ३० जणांचे मृतदेह बाहेर काढले. त्यांची ही जिगर पाहून एनडीआरएफच्या टीमने त्यांना सॅल्यूट केला.

आंबेनळी घाट हा अतिशय खडतर.. ५०० फूट खोलवर छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेल्या बसजवळ पोहोचणे म्हणजे मोठे आव्हान होते. मात्र ६५० फूट लांबीचा रोप दरीत टाकण्यात आला. हायड्रा क्रेनच्या सहाय्याने मृतदेह वर काढण्यात येत होते. त्याशिवाय महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रकाश झोताचे फ्लड लाइट उपलब्ध करून दिले. या प्रकाशात रात्रभर सर्च ऑपरेशन करण्यात आले. घटनास्थळी १० अॅम्ब्युलन्स तैनात करण्यात आल्या होत्या. शोधकार्य संपेपर्यंत शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, राजन साळवी, निरंजन डावखरे यांच्यासह रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी हे घटनास्थळी ठिय्या मांडून होते. सर्व मृतदेह बाहेर काढल्यानंतर आज सकाळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

यादीतील घोळामुळे ‘त्यांच्या’ नातेवाईकांना मनस्ताप
सहलीला जाण्यासाठी दापोलीतील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ४० कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली होती. मात्र मिनी बसमध्ये ३१ कर्मचारी होते. समीर झगडे, रमण झगडे, प्रवीण रणदिवे, सी. बी. तोंडे, संतोष शिंदे, रविकिरण साळवी, अजित जाधव, अमोल सावके हे घरगुती कारणांमुळे सहलीला गेले नाहीत. शनिवारी बस दरीत कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर मृतांची यादी जाहीर करण्यात आली. परंतु त्यात जे कर्मचारी सहलीला गेलेच नाहीत त्यांचीही नावे होती. त्यामुळे ‘त्यांच्या’ कुटुंबीयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. श्रीकांत तांबे हे सहलीला न जाता घरीच थांबले होते. मात्र ते गंभीर जखमी झाले असून त्यांना मुंबईच्या रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमधून आले. त्यामुळे नातेवाईकांचे फोन खणखणले. तब्येतीची विचारपूस अनेकांनी केली. नातेवाईक घरी जमू लागले, पण घरी असलेल्या श्रीकांत तांबे यांना पाहून नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला.

अपघात झाल्याचे वृत्त कळताच महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनीलबाबा भाटिया, अनिल केळगणे, मनोज बिरामणे, अनिकेत नागदरे, कृष्णा बावळेकर तसेच सह्याद्री ट्रेकर्सचे शिलेदार अवघ्या अर्ध्या तासात घटनास्थळी हजर झाले. त्यांच्या जोडीला खेड, पोलादपूर आणि महाडचे ट्रेकर्स, इतकेच नव्हे महाडचा चिंतन वैष्णव, अजय जाधव, सीमेवर शत्रूशी लढणारा आणि गावाला सुट्टीवर आलेला पोलादपूरचा जवान विठ्ठल महाडिक, कापडे येथील चायनीज फूड सेंटर चालवणारा राजेंद्र साने, पोलादपूरचा बाळा प्रभाळे असे असंख्य मर्दमराठे आंबेनळीच्या दरीत उतरले.

पाऊस, धुके आणि किर्र अंधार
अंधार पडूनही एनडीआरएफच्या ३० जणांच्या टीमसह या ट्रेकर्सनी रात्रभर शोधकार्य सुरूच ठेवले. पाऊस, धुके, चिखल आणि त्यात काळीज भेदणारा अंधार अशी स्थिती होती. त्यात साप, विंचवांचे भय. शिवाय कोणत्याही क्षणी दरड कोसळण्याची भीती… निसरडी पाऊलवाट… अशा प्रतिकूल वातावरणातही या टीमने सर्वस्व पणाला लावून शनिवारी १४ तर आज दुपारी दोनपर्यंत १६ मृतदेह बाहेर काढले. वाटेत येणारे कडे हेदेखील मोठा अडथळा ठरत होते.

दापोलीत सन्नाटा
दापोलीत रविवारी अक्षरशः सन्नाटाच होता. दापोलीसह जालगाव आणि गिम्हवणे येथील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. गिम्हवणे-झगडेवाडीतील एकाच कुटुंबातील चार चुलतभावांसह सातजण या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले. त्यामुळे गावावर शोककळा पसरली होती. त्या चौघांवरही एकाच वेळी गिम्हवणे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

आंबेनळी घाट दुर्घटनेत शनिवारी ३३ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यापैकी तब्बल सात जण दापोली तालुक्यातील गिम्हवणे गावचे होते. गावातील तरुणांच्या अशा अकाली जाण्याने गिम्हवणे गावच्या दुःखाला पारावार उरला नव्हता. दापोली-हर्णे रोडवर गिम्हवणे गाव आहे. या गावात बारा वाड्या असून प्रत्येक वाडीची एकेक स्मशानभूमी आहे. हे सर्व मरण पावलेले तरुण गिम्हवणेच्या तेलीवाडीतील राहणारे होते. गावातील तेलीवाडी आणि चर्मकारवाडी या दोन वाड्यांतील लोकांची तेलीवाडी ही एकच स्मशानभूमी आहे. वर्ष-दोन वर्षातून मृत्यूची एखादीच घटना घडत असल्याने येथील स्मशानभूमीही अपुऱ्या जागेत आहे. यावेळी मात्र अशा पद्धतीने अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात अंत्यसंस्कारांची वेळ आल्याने सारेच ग्रामस्थ भांबावले होते. मात्र एकीचे बळ दाखवत त्या ग्रामस्थांनी याच जागेत अंत्यसंस्कार करायचे ठरवत त्या अपुऱ्या जागेत सातही जणांसाठी सरणं रचल्याचे येथील ग्रामस्थ दीपक देवघरकर यांनी सांगितले.

वारसांना सेवेत सामावून घेणार
या सगळयांच्या कुटुंबीयांपैकी जे कायदेशीर वारस आहेत अशाना सेवेत सामावून घेतले जाईल अशी माहिती पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली. शासनाकडून जाहीर करण्यात आलेली ४ लाख रुपयांची मदत सोमवारी सायंकाळपर्यत महसूल विभागाकडून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ३० पैकी २३ कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपाखाली सेवेत घेण्यात येईल. त्याशिवाय उर्वरित जणांच्या वारसांनादेखील स्पेशल केस म्हणून सेवेत घेण्यासाठी आपली राज्यपाल, कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांच्याशी चर्चा झाली असून मुख्यमंत्र्यांशीही आपण यासंदर्भात बोलणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शिवसेनेकडून प्रत्येकी १ लाखाची मदत
शिवसेना नेते आणि केंद्रीय अवजड उद्योग खात्याचे मंत्री अनंत गीते यांनी मृतांच्या कुटुंबीयांना शिवसेनेकडुन प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्यातील अवघड रस्ते, घाट यांना प्रवासाच्या सुरक्षेसाठी बॅरिगेटस् असणे आवश्यक आहे. यासाठी आपण राज्य सरकारला पत्र लिहिणार असून यासंदर्भात होत असलेल्या दुर्लक्षाचा फटका प्रवाशांना सहन करावा लागतो याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.