
जामिया मिलिया विद्यापीठात झालेल्या हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नाराजी दर्शवली आहे. तसेच विद्यार्थी आहेत म्हणून त्यांना हिंसेचा अधिकार नाही असेही न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणी मंगळवारी सुनावणी होणार असून हिंसेच्या घटना अशाच सुरू राहिल्यास सुनावणी करणार नाही, अशी तंबी न्यायालयाने केली आहे.
Supreme Court will hear the matter tomorrow. https://t.co/gAF5Va7HKo
— ANI (@ANI) December 16, 2019
नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून दिल्लीत चांगलीच आग भडकली होती. जामिया मिलिया विद्यापीठात आंदोलनाला हिंसक वळण लागले. विद्यार्थ्यांनी सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केले. वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी न्यायालयाने सु मोटो याचिका दाखल करावी अशी विनंती केली आहे.
याचिकेवर बोलताना सरन्यायाधीश बोबडे म्हणाले की, “विद्यार्थी आहेत म्हणून त्यांना हिंसा करण्याचा कुठलाच अधिकार नाही. सगळे वातावरण शांत झाल्यानंतर या गोष्टींबद्द्ल निर्णय घेता येतील.” आधी दंगल थांबल्यानंतरच निर्णय घेता येतील असेही बोबडे यांनी नमूद केले.
दिल्लीत हिंसक जमावाने पोलीस कर्मचारी, सामान्य नागरिक आणि पत्रकारांना लक्ष्य केले. प्रक्षुब्ध जमावाने जामिया नगर भागात फ्लॅग मार्च काढला होता. तेव्हा उपस्थित जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुरांचा मारा केला. तेव्हा जमावाला हिंसक वळण लागले आणि त्यांनी रस्त्यावरील एका बसला आग लावली.