बुलडाण्यात पेन्सिल सेलमुळे विद्यार्थ्याचा मृत्यू

18

सामना ऑनलाईन । बुलडाणा

बुलडाणा येथील राजीव गांधी मिलिटरी स्कूलमध्ये आपण रोजच्या आयुष्यात वापरत असलेल्या पेन्सिल सेलचा स्फोट होऊन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. २७ मार्चला ही धक्कादायक घटना घडली. या घटनेला शाळा प्रशासनाला जबाबदार धरत नातेवाईकांनी मृतदेह शाळेत आणल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

निवृत्ती शालिग्राम चंडोल असं मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो पाचवीत शिकत होता. पेन्सिल सेलसोबत खेळत असताना त्याने तो तोडांत धरून चावला. याचवेळी या सेलचा स्फोट झाला आणि या स्फोटात निवृत्तीच्या छातीला आणि डोळ्याला गंभीर इजा झाली. उपचारासाठी त्याला बुलडाणा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती अतिशय गंभीर झाल्याने त्याला मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले होते. उपचारादरम्यान मुंबईतील जे.जे. रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. निवृत्तीच्या मृत्यूला शाळा प्रशासन जबाबदार असून शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवृत्तीच्या नातेवाईकांनी केली आहे. ही मागणी करत निवृत्तीचा मृतदेह त्याचे नातेवाईक शाळेत घेऊन आले आणि जोपर्यंत ही कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे शाळा परिसराता काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी मध्यस्थी करत चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलिसांनी नातेवाईकांना दिले.

आपली प्रतिक्रिया द्या