दिल्लीत विकृताचं चालत्या बसमध्ये तरुणीसमोर हस्तमैथून

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राजधानी दिल्लीमध्ये एक धक्कादायक आणि लाजिरवाणी घटना समोर आली आहे. बसमधून प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीसमोर एक प्रवासी हस्तमैथुन करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या व्यक्तीने तरुणीसोबत छेडछाड केल्याची माहितीही समोर येत आहे. तरुणीने वंसत विहार पोलिसात याबाबत तक्रार केली आहे, मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

पीडित तरुणीने हस्तमैथुन करणाऱ्या या विकृत व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्यक्ती बसमध्ये या तरुणीच्या शेजारी येऊन बसला. काही वेळाने त्याने चालत्या बसमध्ये हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या प्रकारामुळे तरुणीला काय करावे हे सुचत नव्हतं. तरुणीने बसमधील सेफ्टी अलार्म वाजवून मदत मागितली, मात्र तिला मदत करण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. त्यानंतर अशा विकृत प्रवृत्तींबद्दल सर्वांना कळावं यासाठी तरुणीने या घटनेचा व्हिडीओ शूट केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला.

दिल्ली पोलीस, पोलीस आयुक्त, मुख्यमंत्री, महिला आयोग यांना टॅग करत हा व्हिडीओ तरुणीने ट्वीट केला होता. मात्र महिला आयोग वगळता कोणीही पीडित तरुणीची मदत केली नाही. घडलेल्या प्रकाराची तक्रार करण्यासाठी पीडित तरुणी वसंत विहार पोलीस स्टेशनमध्येही गेली, तर तिला ६ तास बसून ठेवण्यात आलं. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मातीवाल यांनी पोलिसात तक्रार करण्यासाठी आपल्याला मदत केल्याची माहिती पीडित तरुणीने दिली.

याआधी मुंबईतही अशीच घटना घडली होती. मरिन ड्राइव्ह येथे महिलांसमोरच एक व्यक्ती अश्लिल चाळे करत होता. महिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या