शाळेच्या बससाठी विद्यार्थीनींनी केली श्रमदानातून रस्त्याची डागडुजी

460

मागील पंचवीस दिवसांपासून मानव विकासची बस बंद असल्याने सेनगाव तालुक्यातील वडहिवरा गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने विद्यार्थ्यांनी व विद्यार्थींनीनी स्वत:च श्रमदानातून १७ किमी रस्त्याची डागडुजी केली. या श्रमदानात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्यासह शिवसैनिकांनी सहभाग घेऊन मदत केली.

एकीकडे बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा केंद्र सरकारकडून दिला जात आहे. शिक्षणाचा मुलभुत हक्क म्हणुन नवीन कायदा देखील करण्यात आला आहे.  दुष्काळी व अविकसित सेनगाव तालुक्याचा मानव विकास मिशन कार्यक्रमात समावेश आहे.  वडहिवरा गावातील 62 विद्यार्थी व विद्यार्थिनी वरुड चक्रपाण येथील माध्यमिक खासगी शाळेत शिक्षणासाठी जातात.  वडहिवरा ते वरुड चक्रपाण जाण्यासाठी  विद्यार्थ्याकरीता मानव विकासची बससेवा कार्यान्वीत केली आहे. मात्र,  मागील पंचेवीस दिवसापासून  रस्ता खराब असल्याने राज्य परिवहन महामंडळाने ही बससेवा बंद केली होती. बससेवा बंद असल्याने गावातील विद्यार्थी, विद्यार्थीनींचे शैक्षणिक नुकसान होत होते़. बससेवा सुरू करावी या मागणीसाठी विद्यार्थीनींनी व ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे ६२ विद्यार्थी व विद्यार्थिनीनी एकत्रित येऊन वड हिवरा ते वरूड चक्रपान हा १७ कि. मी. रस्ता डोक्यावर टोपले घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी श्रमदान केले.

या श्रमदानानंतर तरी बससेवा सुरू व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  दरम्यान, विद्यार्थी व विद्यार्थीनी श्रमदान करीत असल्याने या श्रमदानात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी देखील शिवसैनिकांसह सहभाग घेऊन श्रमदान केले. या श्रमदानासाठी जगन पुरी, गजानन गवळी, वसंता कळासरे, गंगाधर दिंडे, ज्ञानेश्वर पुरी, संतोष जाधव, विद्यार्थीनी मयुरी कांबळे, युगंधरा दिंडे, प्रतिक्षा हाके, पुणम दिंडे, निकिता वाबळे, आरती पुरी, शिवानी पोले आदींसह विद्यार्थीनीनी सहभाग नोंदवला. त्यामुळे आतातरी बससेवा सुरू व्हावी अशी मागणी विद्यार्थ्याकडून केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या