अकरावीच्या वाढीव जागांच्या प्रवेशाकडे विद्यार्थ्यांची पाठ

सामना ऑनलाईन, मुंबई

जादा फी आणि मार्केटमध्ये नाव नसलेल्या नव्याने मान्यता मिळालेल्या कॉलेजांकडे विद्यार्थी पाठ फिरवत आहेत. दरवर्षी अकरावी प्रवेशाच्या तोंडावर शालेय शिक्षण विभाग नव्या कॉलेजांच्या प्रस्तावावर मंजुरीची मोहोर उमटवते. पण या नवख्या कॉलेजविषयी प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांना काहीच माहिती नसते. तसेच या कॉलेजना विनाअनुदानित किंवा स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर मान्यता मिळत असल्याने तेथील प्रवेश फीदेखील अवाच्यासवा असते. त्यामुळे यंदाही अकरावीच्या हजारो जागा रिक्त राहण्याची चिन्हे आहेत.

गेल्या वर्षी अकरावीची प्रवेशक्षमता वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने नव्या २८ कॉलेजांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या जागांमध्ये चार हजार नव्या जागांची भर पडली होती. यंदाही शिक्षण विभागाने हा कित्ता गिरवला असून ३६ नव्या कॉलेजांचे प्रस्ताव शिक्षण संचालकांकडे पाठविले आहेत. या कॉलेजांमुळे अकरावीच्या आर्टस्, कॉमर्स आणि सायन्ससाठी नव्या ४८ तुकड्या निर्माण होणार असून चार हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध होणार आहेत.

नामांकित कॉलेजच हवे; नव्या कॉलेजला का जायचे?
दरवर्षी दिसणारी अकरावी प्रवेशाची चुरस ही काही नामांकित कॉलेजपुरती मर्यादित आहे. विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्येच प्रवेश हवा असतो. या कॉलेजमधील जागा या अनुदानित असल्याने तेथील प्रवेश फी कमी असते. पण नव्याने सुरू होणाऱ्या कॉलेजना स्वयंअर्थसहाय्यित किंवा अनुदानित तत्त्वावर मान्यता देण्यात येत असल्याने येथील प्रवेश फी अनुदानित कॉलेजच्या फीच्या तुलनेत कित्येक पटीने जास्त असते. त्यामुळे अशा नवख्या कॉलेजमध्ये प्रवेश का घ्यायचा, असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे.

  •  गेल्या वर्षी म्हणजेच २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात ७१९ कॉलेजमध्ये अकरावीचे प्रवेश झाले. यातील २८ कॉलेजना नव्याने मंजुरी मिळाली होती.
  • दक्षिण मुंबईतील ९१, उत्तर मुंबई १३३, पश्चिम मुंबई १८० तसेच ठाणे आणि नवी मुंबईतील अनुक्रमे ८१ आणि ५६ कॉलेजमध्ये अकरावी प्रवेश झाले होते.
  • प्रवेशासाठी २ लाख ८० हजार ५०० जागा उपलब्ध होत्या यापैकी २ लाख २३ हजार ९७५ जागांवर प्रवेश झाले.

हजारो जागा यंदाही रिक्त राहणार
अकरावी प्रवेशाची बोंब होऊनही दरवर्षी हजारो जागा रिक्त राहतात. गेल्या वर्षी तब्बल ५६ हजार ५२५ जागा रिक्त राहिल्या होत्या. यातील बहुतांश कॉलेजमध्ये प्रवेशासाठी एकाही विद्यार्थ्यांनी अर्ज केला नव्हता. यंदाही ही परिस्थिती कायम राहणार असून हजारो जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.