माध्यमांतराचा अभ्यास

<< संवाद >>     <<   शुभांगी बागडे >> 

चित्रपट अभ्यासक आणि ललित लेखक विजय पाडळकर यांचे गगन समुद्री बिंबलेहे पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे नुकतेच प्रकाशित झाले आहे. साहित्यकृतींवर आधारित चित्रपट होताना या दोन्ही कला आपल्या जागी महत्त्वाच्या असतात. या पुस्तकाद्वारे सत्यजित रे यांच्या कलाकृतींचा वेध घेत माध्यमांतर अभ्यासाबाबत विजय पाडळकर यांनी विस्तृत विश्लेषण केले आहे. त्या संदर्भात त्यांच्याशी केलेली ही बातचित

आपण कथा, कादंबरी, ललित लेखन असे विविध प्रकारचे साहित्यप्रकार यशस्वीपणे हाताळले आहेत. आपले नवे गगन समुद्री बिंबलेहे पुस्तक यापैकी कोणत्या गटात मोडते?

या पुस्तकाला सर्साधारणपणे कला-आस्वादपर लेखन असे म्हणता येईल. चित्रपट ही आजच्या युगाची अत्यंत महत्त्वाची कला आहे. या कलेचा अभ्यास विविध पद्धतीने केला जाऊ शकतो. अनेक चित्रपट हे गाजलेल्या साहित्यकृतींकरून तयार केले जातात. त्या मूळ कृती आणि त्यांच्यावर आधारित चित्रपट यांच्यातील साम्य-विरोधांची चर्चा करणे, मूळ कलाकृतीत झालेल्या बदलांची चिकित्सा करणे आणि दोन्ही कलाकृतींचा आस्वादकांच्या मनावर होणारा परिणाम शब्दबद्ध करणे हे माझ्या पद्धतीचे वैशिष्टय़ आहे. ‘गगन समुद्री बिंबले’ हे नवे पुस्तक हा माझ्या याच ‘माध्यमांतर’-अभ्यासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

या पुस्तकासंबंधी थोडे तपशीलवार सांगा.

सत्यजित राय हे जगातील सर्वश्रेष्ठ चित्रपट दिग्दर्शकांपैकी एक. या महान कलावंताच्या चित्रपटांचा अभ्यास करतांना मला जाणवले की त्यांचे बहुसंख्य चित्रपट हे कुठल्या न कुठल्या गाजलेल्या साहित्य कृतीवर आधारित आहेत. एखादा मनस्वी कलावंत कलेच्या आपल्या क्षेत्रातील पुनर्निर्मितीसाठी जेव्हा दुसऱ्या एखाद्या क्षेत्रातील कलावंताचा आधार घेतो तेव्हा त्यामागे काय कारणे असतात, त्याच्यासमोर काय आव्हाने असतात व तो त्यांना कसा सामोरा जात आपले एक स्वतंत्र विश्व कसे निर्माण करतो हे सत्यजित राय यांच्या चित्रपटांतून अतिशय ठळकपणे जाणवणारे अंतःप्रवाह. यांचा शोध घेण्याचा प्रयत्न मी ‘नाव आहे चाललेली’ या पुस्तकातून प्रथम केला. त्या पुस्तकांत राय यांची गाजलेली ‘अपू त्रिवेणी’ आणि विभूतीभूषण बंडोपाध्याय यांच्या मूळ दोन कादंबऱ्या यांचा तौलनिक अभ्यास सादर केला होता. नंतर माझ्या ध्यानात आले की सत्यजित राय हे एका पुस्तकात मावणारे कलावंत नाहीत. त्यानंतरच्या काळात मी राय यांचे ‘तीन कन्या’, ‘चारुलता’ (हे दोन्ही चित्रपट रवींद्रनाथ टागोरांच्या कथांवर आधारित) ‘शतरंज के खिलाडी’ (प्रेमचंदांच्या कथेवर) आणि ‘गणशत्रू’ (इब्सेनच्या ‘Enemy of the people’ या नाटकावर) या चित्रपटांचाही या दृष्टीने अभ्यास केला. या पुस्तकात ‘अपू त्रिवेणी’सह या नव्या चित्रपटांवरील लेखांचाही अंतर्भाव केला आहे.

या अभ्यासातून तुम्ही कोणते निष्कर्ष काढले आहेत?

‘गगन समुद्री बिंबले’ या पुस्तकाला मी ‘माध्यमांतर’ या विषयाकर एक सविस्तर प्रस्तावना जोडली आहे. तिच्यात आणि पुस्तकातील अन्य लेखांत हे निष्कर्ष मी तपशीलवार मांडले आहेत. एखादा चित्रपट जेव्हा गाजलेल्या साहित्यकृतीवर आधारित असतो तेव्हा तो पाहताना रसिकाला प्रथम दिग्दर्शकाने मूळ पुस्तकात केलेले बदल ठळकपणे जाणवतात. पण कुठलेही पुस्तक जसेच्या तसे चित्रपटांत रूपांतरित करता येत नाही ही गोष्ट सर्वप्रथम ध्यानात घेतली पाहिजे, कारण शब्दमाध्यम आणि दृश्यमाध्यम यांचे स्वरूपच अत्यंत वेगळे आहे. तेक्हा बदल हे होणारच, त्यांच्याबद्दल तक्रार करण्यात अर्थ नाही. मात्र मतभेद निर्माण होतात ते या बदलांचे प्रमाण किती असावे याबद्दल. शिवाय अनेक बदल हे केवळ माध्यमाची गरज म्हणून केले जात नाहीत. त्या बदलांमागे व्यवसायाशी तडजोड हेही एक महत्त्चाचे कलाबाह्य कारण असते. बऱयाच वेळा मूळ कलाकृतीची निर्माता-दिग्दर्शक यांच्या लहरीप्रमाणे हवीतशी मोडतोड केली जाते. माध्यमांतराचा अभ्यास करताना कोणते बदल अटळ होते यांचा विचार केला पाहिजे तसेच उरलेले बदल का केले याचाही अभ्यास केला पाहिजे. शिवाय या बदलांमुळे मूळ कलाकृतीचे सौंदर्य काढले की कमी झाले याचीही चिकित्सा केली पाहिजे.

चित्रपट आणि मूळ कलाकृती यातील अभ्यास नेमका कशा पद्धतीने मांडता यायला हवा, असं तुम्हाला वाटतं?

खरंतर या प्रकारच्या अभ्यासाविषयी मराठी चित्रपट समीक्षकांत काही गैरसमज आहेत. एखाद्या चित्रपटापेक्षा मूळ साहित्यकृती श्रेष्ठ होती असे प्रतिपादन केले की त्यांना तो चित्रपटकलेचा अपमान वाटतो. वास्तविक असे नसते. हा तौलनिक अभ्यास आहे. कधीकधी चित्रपट हा मूळ साहित्यकृतीपेक्षा सरस असतो. अनेकदा नेमके उलटही घडते. माध्यमांतर अभ्यासताना दोन्ही माध्यमांची बलस्थाने व मर्यादा लक्षात घ्याव्या लागतात. माझे लेखन वाचून काही चित्रपटप्रेमी अभ्यासकांनी चित्रपट व साहित्य या दोन वेगवेगळ्या कला आहेत व म्हणून माध्यमांतराचा अभ्यास करण्याचीच गरज नाही अशी भूमिका घेतली. चित्रपटात काय दाखविले आहे व ते ‘कसे’ दाखविले आहे याचाच-चित्रपटीय अभिव्यक्तीचाच- विचार करावा, दुसरीकडे साहित्याच्या अभ्यासकांनी, चित्रपटविषयक लेखन हे करमणूकप्रधान व बिनमहत्त्वाचे असते असा गैरसमज मनात असल्यामुळे, त्याची दखल घेण्याचे टाळले. या दोन्ही भूमिका टोकाच्या असून त्या अभ्यास आणि विश्लेषण नाकारणाऱया आहेत असे माझे मत आहे.

चित्रपट हे आपली कलाविषयक जाण वाढवतात परंतु आपल्याकडे याबाबत तितकंसं महत्त्व दिलं जात नाही, याबाबत तुमचं मत काय आहे?

आपल्याकडे चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन आहे, असेच बिंबवले गेले आहे. त्यामुळेच चित्रपटांकडे कलाविषयक, साहित्य विषयक दृष्टिकोनाने पाहिले जातच नाही. खरंतर चित्रपट समीक्षा ही साहित्यिक समीक्षेचा एक भाग मानली पाहिजे कारण तिच्यातून कला विषयक वेगळा विचार मांडला जाऊ शकतो. इंग्रजीत या विषयावर हजारो ग्रंथ आहेत, अमेरिकेत व युरोपात अनेक युनिर्व्हसिटीमधून हा विषय शिकविला जातो आणि तो चित्रपटअभ्यासाचे महत्त्वाचे अंग आहे हे मान्य झालेले आहे. इंग्रजीच्या प्राध्यापकाने शेक्सपिअरच्या नाटकावर तयार केलेले चित्रपट अवश्य पाहावेत कारण त्यामुळे शेक्सपिअर समजण्यास अधिक मदत होईल. किती प्राध्यापक चित्रपटांविषयी अशी आस्था बाळगतात वा या जाणिवेने सिनेमा पाहतात? चित्रपट ही केवळ करमणूक नक्हे, ती अनेक अंगांनी तपासता येईल अशी कला आहे हे जागरूक वाचकाला या पुस्तकाच्या वाचनातून कळेल. सत्यजित राय जेव्हा मूळ कलाकृतीत काही बदल करतात तेव्हा ते तसे का करतात याचा अभ्यास त्या थोर दिग्दर्शकाची मानसिकता व जडणघडण यांच्यावर प्रकाश टाकू शकतो.

–  चित्रपट व साहित्यकृती यांचा परस्परसंबंध कसा जोखला गेला पाहिजे?

चित्रपट कला व साहित्य यांचा परस्परसंबंध जोडताना वा त्यांचा अभ्यास करताना ‘चित्रपट श्रेष्ठ की साहित्यकृती’ असा विचार त्यामागे नसतोच व नसावाही. येथे तुलना असते ती एकाच बीजांतून निर्माण होणाऱया दोन वृक्षांची. उदाहरणार्थ ‘शतरंज के खिलाडी’ हा प्रेमचंदांच्या कथेवरील चित्रपट फसला आहे असे म्हटले की तो सत्यजित राय यांचा अपमान आहे असे समजणे चुकीचे आहे. एकाच लेखकाच्या साऱया कथा जशा श्रेष्ठ नसतात त्याप्रमाणे एका दिग्दर्शकाचे सारे चित्रपटही श्रेष्ठ नसतात. हे कटू वाटले तरी सत्य आहे. सत्यजित राय यांच्या चित्रपटांनी मला जो आनंद दिला आहे तो इतरांना वाटणे आणि त्या चित्रपटांनी मला व्यक्ती म्हणून कसे श्रीमंत केले आहे याचा शोध घेणे हे या लेखनाचे मुख्य हेतू आहेत. एका प्रतिभावंताच्या कृतीमधून दुसऱया प्रतिभावंताने निर्मिलेलं प्रभावी विश्व म्हणजे जणू आकाशाने समुद्रात उतरणे. हे आकाशाचे समुद्रातील रूप न्याहाळताना वाचकालाही तो आनंद मिळावा ही अपेक्षा.

या पुढील तुमचे नवे प्रकल्प काय आहेत?

सत्यजित राय यांच्या चित्रपटांचा अभ्यास अजून पूर्ण झाला नाही. आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी २९ चित्रपट निर्माण केले शिवाय काही डॉक्युमेंटरी व लघुपटही काढले. या चित्रपटांच्या अभ्यासासाठी मूळ साहित्यकृती वाचण्यास मिळणे आवश्यक आहे. दुर्दैवाने त्यांनी निर्मिलेले काही चित्रपट असे आहेत की ज्यांच्या मूळ साहित्यकृती इंग्रजी अनुवादात उपलब्ध नाहीत. ज्या उपलब्ध झाल्या आहेत त्यांच्याकरील कामाला सुरुवात केली आहे. सत्यजित हा विषय कायमचा साथ देणारा आहे व तो तसा राहावा हीच इच्छा

utsav@saamana.com