Stunning Girl

>> लीना टिपणीस

नेहा धुपिया. एक छान मॉडेल. भरपूर उंची आणि सणसणीत बांधा… यामुळे तिला कोणताही पेहराव शोभतो.

फॅशनच्या बाबतीत ती फार जागरुक असते…मग त्यासाठी सोशल मीडियापासून ते अगदी वेगवेगळ्या माध्यमांतून ती स्वतःला अपडेट ठेवत असते….फक्त फॅशनच नाही तर तिचं सामान्य ज्ञानही चांगलं आहे. फॅशनच्या जगाबरोबरच आजूबाजूच्या घटनांबाबत ती अपडेट असते. तिला काळाबरोबर चालायला आवडतं. ही अभिनेत्री म्हणजे आजची स्टनिंग गर्ल नेहा धुपिया. आज आपण तिच्याविषयी जाणून घेऊया.

नेहा धुपिया ही एक उत्तम अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिच्या फॅशनच्या बाबतीत बोलायचे तर ती फार ट्रेण्डी आहे. ती तिच्या कामाबाबत कायम पारदर्शक असते. तिला काय करायचे आणि काय नाही याबाबत ती फोकस्ड असते. माझं पहिल्यांदा नेहासोबत बोलणं झालं ते एका शोसंदर्भात एका पीआर कंपनीने फोन केला आणि सांगितले, “लीना, तुला ‘मेगदावल’ हा शो करायचा आहे आणि ‘मेगदावल’साठी शो स्टॉपर म्हणून आम्ही नेहा धुपियाला घेणार आहोत.’’ तर माझा असिस्टंट तिच्या घरी गेला. तिला तीन-चार ड्रेस दाखवले. त्याच्यामध्ये जो माझ्या मनात होता तोच ड्रेस तिने निवडला. तो ड्रेस आम्हाला थोडासाच अल्टर करावा लागला आणि काय योगायोग! माझ्या मनात होते की, त्या शोच्या शो स्टॉपरने तो ड्रेस घालावा आणि तिने तोच निवडला. नेहाचा बॉडी टाईप चांगला आहे. तिची उंची आणि ऍथलेटिक बॉडीमुळे तो ड्रेस तिला फारच आकर्षक दिसत होता.

माझी पहिली भेट त्या शोदरम्यान झाली. हा शो जुहू हॉटेलमध्ये होता आणि ती शोच्या आधी दोन तास फिटिंगसाठी आली होती. ऑल्टरेशन वगैरे सर्व आम्ही केले होते आणि तिला तो फक्त ड्रेस घालायचा होता. तिने जेव्हा तो ड्रेस घातला आणि मागे वळली तेव्हा इतकी सुंदर वाटली की, जादू झाल्यासारखे वाटले. ती इतकी अप्रतिम दिसत होती. ती खूप उत्साही, प्रेमळ मुलगी आहे. तिच्यात एक स्पार्क आहे. नेतृत्वगुण तिच्याकडे आहेत. रॅम्पवर चालायची वेळ आली तेव्हा ती खूप सहजतेने चालली. तिची शरीरयष्टी, चालण्याची पद्धत, तिच्यात तो आत्मविश्वास भरभरून दिसत होता. तिचा आत्मविश्वास पाहून फार आनंदी झाले आणि माझाही आत्मविश्वास वाढला. कौतुकाची गोष्ट म्हणजे कमी वेळात तिने इतकं छान रॅम्प वॉक केलं होतं. त्या शोच्या शेवटी आम्हाला बराच चांगला प्रतिसाद मिळाला. दुसऱया दिवशी अनेक वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर नेहा धुपिया झळकली होती. नेहा एक मॉडेल, अभिनेत्री म्हणून परिपूर्ण आहे. स्वतंत्र विचारांची, मॉडर्न, प्रचंड हुशार, दूरदृष्टी असणारी अशी ती आह असं मला वाटतं. तिला फॅशन आणि कपडय़ांबाबत अधिकाधिक जाणून घेण्याची आवड़ असते. विशेष म्हणजे ती जे काही काम निवडते त्यात ती शंभर टक्के देते.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या