
गुजरातमधील अहमदाबादेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अहमदाबाद पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने 28 वर्षांच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना अटक केली आहे. मयंक पटेल असं या उपजिल्हाधिकाऱ्याचे नाव आहे. एका महिला सरकारी अधिकाऱ्याला ब्लॅकमेल केल्याचा पटेल यांच्यावर आरोप आहे. पटेल आणि तक्रारदार महिला सोबत काम करत असताना त्यांनी या महिलेचे खासगी फोटो आणि व्हिडीओ मिळवले होते. याच फोटो – व्हिडीओंच्या त्याने आपल्याला ब्लॅकमेल केल्याचं पीडितेने तक्रारीत म्हटलं होतं.
पटेल हे अरावली जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी आहेत. तक्रारदार महिला ही देखील सरकारी अधिकारी असून तिच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पटेल यांच्याविरोधात कारवाई केल्याचे सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित वसावा यांनी सांगितले आहे. तक्रारदार महिला ही विवाहीत आहे. हे माहिती असतानाही पटेल हे तिच्यावर संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत होते. याला नकार दिल्याने पटेल हे तिला खासगी फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत होते. 9 वेगवेगळ्या नंबरवरून पटेल यांनी आपल्याला कॉल आणि मेसेज केले होते असं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे.