अग्निसुरक्षा : गरज आणि उपाय

72

सुभाष कमलाकर राणे

[email protected]

मुंबई-पुण्यापाठोपाठ संपूर्ण महाराष्ट्रात झपाटय़ाने शहरीकरण होत आहे. महत्त्वाच्या सर्वच शहरांमध्ये अग्निशमन दलाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातूनही अग्निसुरक्षिततेचे वेगवेगळे प्रकल्प राबवून अग्निशमन दले लहान मुलांना व सर्वसामान्यांना प्रशिक्षणाचे धडे देत असतात. अग्निशमन दलाचा वाढता ताण लक्षात घेता प्राथमिक अग्निशमन सुरक्षिततेसाठी नागरिकांनीही स्वतःच्या सुरक्षिततेसाठी स्वतःच अद्ययावत राहणे आवश्यक आहे.

कमला मिलच्या अग्निदुर्घटनेनंतर फक्त दोनच महिन्यांत मुंबईमध्ये ३०० पेक्षा जास्त आगीच्या घटना घडल्या. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोनुसार अग्निदुर्घटनांमध्ये महाराष्ट्र राज्य देशात पाचव्या क्रमांकावर आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल.

मुंबई-पुण्यापाठोपाठ संपूर्ण महाराष्ट्रात झपाट्याने शहरीकरण होत आहे. महत्त्वाच्या सर्वच शहरांमध्ये अग्निशमन दलाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातूनही अग्निसुरक्षिततेचे वेगवेगळे प्रकल्प राबवून अग्निशमन दले लहान मुलांना व सर्वसामान्यांना प्रशिक्षणाचे धडे देत असतात. अग्निशमन दलाचा वाढता ताण लक्षात घेता प्राथमिक अग्निशमन सुरक्षिततेसाठी नागरिकांनीही स्वतःच्या सुरक्षिततेसाठी स्वतःच अद्ययावत राहणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र शासनाने ६ डिसेंबर २००८ रोजी महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवन सुरक्षा उपाययोजना अधिनियम २००६ तसेच त्याअनुषंगाने २३ जून २००९ पासून महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवन सुरक्षा उपाययोजना नियम २००८ लागू करून जनतेला अग्निशमनाबाबत कायद्याचे पाठबळ दिले आहे. या कायद्यामुळे राष्ट्रीय बांधकाम संहिता ही मार्गदर्शक पुस्तिका आता सर्वांना बंधनकारक झाली आहे.

राष्ट्रीय बांधकाम संहितेमध्ये इमारतीचे नऊ प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये शैक्षणिक इमारती, औद्योगिक इमारती, संस्थेच्या इमारती, समाजमंदिर, साठवणूक इमारती, धोकादायक इमारती व वाणिज्यिक इमारती यांना उंचीची बंधने घातलेली आहेत, परंतु निवासी इमारती व व्यावसायिक इमारती यांना उंचीचे बंधन घालण्यात आलेले नाही.

निवासी उंची इमारतींमधील अग्निशमन यंत्रणेची देखभाल न होण्याचे एकमेव महत्त्वाचे कारण म्हणजे निधीची कमतरता आणि देखभालीसाठी येणारा खर्च. सर्वसामान्यांना हा खर्च वायफळ वाटतो व त्यामुळे यंत्रणेकडे पूर्ण दुर्लक्ष होते. शिवाय अपुरे ज्ञान व ही यंत्रणा वापरण्यासाठी आवश्यक प्रशिक्षित कर्मचारीवर्गाची वानवा या यंत्रणेला पूर्णपणे निकामी करते.

इतर सर्व वर्गीकरणातील इमारतींमध्येसुद्धा थोड्याफार फरकाने हीच स्थिती दिसते, पण निवासी इमारती व व्यावसायिक इमारतींव्यतिरिक्त इतर इमारतींना असलेल्या उंचीच्या बंधनामुळे व कायद्याच्या तरतुदीमुळे या इमारतींमधील यंत्रणेची स्थिती बऱ्याचशा प्रमाणात चांगली असते.

सद्यस्थितीमध्ये व्यावसायिक इमारतींमधील धोके इतर इमारतींपेक्षा विचारात घ्यायला हवेत. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अशा प्रकारच्या इमारतींमधील विविध वहिवाटी, वेगवेगळय़ा उद्योगांची कार्यालये, वास्तुविकासक या इमारती बांधून झाल्यानंतर विविध कार्यालयांना एक तर हे मजले विकून तरी टाकतो अथवा भाडेतत्त्वावर देतो. त्यामुळे एका इमारतीमध्ये वेगवेगळय़ा प्रकारची कार्यालये कार्यरत असतात. प्रत्येकजण स्वतःच्या कार्यालयाच्या सुरक्षेततेबाबत जागरूक असतो व स्वतःच्या अग्निशमन यंत्रणेची निगा ठेवतो, परंतु इमारतीला असलेल्या सार्वजनिक अग्निशमन यंत्रणेकडे म्हणजेच ऍक्टिव व पॅसिव्ह यंत्रणेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले असते. प्रत्येक कार्यालय आपल्या मजल्यावरील कार्यालयामध्ये सुशोभीकरण करून घेत असताना आतील भागात वेगवेगळय़ा प्रकारचे बदल करून घेतात. त्यामुळे पॅसिव्ह यंत्रणेमध्ये म्हणजेच मोकळी जागा, दरवाजे, कॉरिडॉर, पॅसिजेस, लॉबी, मजल्याची उंची, फॉल सिलिंग, वायुविजन यंत्रणा इत्यादींमध्ये बदल झालेले असतात. त्यामुळे व्यावसायिक इमारतींमधील प्रत्येक मजला आतील इंटेरियर व विमोचन कार्यामध्ये अनेक अडचणी येऊन जीवितहानी होण्याची शक्यता जास्त असते.

वास्तविक प्रत्येक उंच इमारतीमध्ये वर्षातून दोनदा तरी निकासन प्रॅक्टिस करणे आवश्यक असते, परंतु अनेकदा कार्यालयीन तसेच इतर अडचणींमुळे याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते, परंतु आपण एक सुजाण नागरिक म्हणून काही गोष्टी निश्चितच करू शकतो. आपण अमलात आणलेल्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आगीच्या घटनेच्या वेळी अग्निशमन दलाला योग्य माहिती देण्यासाठी व इमारतींमधील रहिवाशांचे सुरक्षित निष्कासन करण्यासाठी अथवा आगीवर त्वरित नियंत्रण आणण्यासाठी नक्कीच उपयोगी पडू शकतात.

अग्निशमन दलाला जनतेचे सहकार्य हवे असते. अर्थात हे सहकार्य आग विझविण्यासाठी नसते तर अग्निशमन दलाचे वाहन पोहोचेपर्यंत घटनास्थळी योग्य प्रकारचे एक्ंिस्टग्विशर वापरून आग काबूत ठेवणे अथवा विझविणे, इमारतींमधील लोकांची सुटका करणे, स्वतःचे योग्यप्रकारे  निष्कासन करणे, अग्निशमन कर्मचाऱ्यांना आग विझविण्यासाठी इमारतींमधील योग्य साधनांची माहिती देणे अपेक्षित असते. मात्र त्याऐवजी अनेकदा अतिउत्साहामुळे अग्निशमन दलाला सामान्यजनांकडून अडीअडचणींनाच तोंड द्यावे लागते.

सर्वसामान्यपणे अग्निशमनासाठी असलेल्या जिन्याकडे सर्वांचे दुर्लक्ष होते व यामध्ये इतर सामान जमा करण्याचे प्रकार सर्रास होत असतात. उंच इमारतीमधील आणखी एक बाब म्हणजे ‘रिफ्युज एरिया’. राष्ट्रीय बांधकाम संहितेनुसार सर्वसाधारणपणे पहिला रिफ्युज एरिया २४ मीटरवर व त्यापुढील प्रत्येक रिफ्युज एरिया १५ मीटरवर देण्यात येतो. आगीच्या वेळी स्वतःची सुटका करताना तळमजल्यावर जाऊन पोहोचता येत नसेल तर स्वतःच्या सुरक्षिततेसाठी तसेच वयस्कर व आजारी व्यक्तींसाठी या जागेचा उपयोग सुरक्षित जागा म्हणून केला जातो. हा एरिया कसा असावा याबद्दल योग्य ती माहिती राष्ट्रीय बांधकाम संहितेमध्ये दिलेली आहे, परंतु ही जागा बऱ्याच वेळा अयोग्य प्रकारे वापरली जाते. एक सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाने या जागेची देखभाल करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

बऱ्याच वेळा व्यावसायिक इमारतींमध्ये आग पसरण्यास एअरकंडिशनची मार्गिका, वायुविजन करणाऱ्या मार्गिका, इलेक्ट्रिकच्या केबल वाहून नेणाऱ्या मार्गिका तसेच इमारतींमध्ये असलेले कॉरिडॉर, लॉबी, जिना इत्यादी ठिकाणी केलेली जळाऊ पदार्थांची साठवणूक आग पसरविण्यास कारणीभूत ठरते. याव्यतिरिक्त आज काचेची तावदाने असलेल्या इमारती सर्वत्र दिसत आहेत. एखाद्या मजल्यावरील आगीमध्ये जर काचेची तावदाने उष्णतेने व आगीने तुटल्यास आग सहजपणे वरच्या मजल्यावर पसरू शकते.

सर्वसाधारणपणे उंच इमारती व विविध वर्गीकरणांमधील धोकादायक इमारतींमध्ये आगीची व धुराची तत्काळ सूचना मिळविण्यासाठी स्मोक डिटेक्टर्स, हिट डिटेक्टर्स, फ्लेम डिटेक्टर्स, मॅन्युअल कॉल पॉइंट इत्यादी बसविलेले असतात. त्यामुळे एखादी आगीची घटना घडल्यास हुटर व पॅनलद्वारे सिक्युरिटीला त्वरित त्याबाबतची माहिती मिळू शकते व योग्य ती कार्यवाही त्वरित करता येते. तसेच आगीवर त्वरित काबू मिळविण्यासाठी प्रिंकलर्स, हायड्रंट, होजरिल, पाण्याची पाइपलाइन, पाण्याच्या ओव्हरहेड-अंडरग्राऊंड टाक्या, वेगवेगळय़ा प्रकारचे फायर पंप्स व त्यांना इलेक्ट्रिक मेन सप्लायव्यतिरिक्त डिझेल जनरेटर सप्लाय देण्यात आलेले असतात. आपल्याला फक्त त्यांची योग्य माहिती, निगा व काळजी घेणे आवश्यक असते व त्याची योग्य ती माहिती व जागा अग्निशमन कर्मचाऱ्यांना आगीच्या घटनेच्या वेळी त्वरित देणे आवश्यक असते. जेणेकरून लवकरात लवकर अग्निशमन दलाला या यंत्रणेचा वापर करून आगीवर त्वरित काबू मिळविणे शक्य होते.

(लेखक अग्निशमन क्षेत्रातील तज्ञ आहेत)

आपली प्रतिक्रिया द्या