माझ्यासाठी दिवाळी ही नेहमीच भरभराटीची- सुबोध भावे

157
फोटो सौजन्य- फेसबुक

रश्मी पाटकर, मुंबई

सध्या एका अभिनेत्याने मोठा आणि छोटा पडद्या चांगलाच व्यापलाय. प्रेक्षकांमध्येही त्याचीच चर्चा सुरू आहे. अर्थात ते नाव तुम्ही ओळखलंच असेल. हा अभिनेता म्हणजे सुबोध भावे. ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य’ आणि आता ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटांमुळे तो तीन चरित्रपट करणारा मराठीतला एकमेव अभिनेता ठरला आहे.

ऐन दिवाळीत प्रदर्शित होणाऱ्या त्याच्या ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटासाठी तो खूपच उत्साही आहे. त्याच्यासाठी दिवाळी ही नेहमीच भरभराटीची असल्याचं मनोगत त्याने सामना ऑनलाईनकडे व्यक्त केलं. जवळपास तीन वर्षांपूर्वी दिवाळीच्याच दिवसांमध्ये सुबोधने दिग्दर्शित केलेला कट्यार काळजात घुसली हा चित्रपट तिकीटबारीवर तुफान लोकप्रिय ठरला होता. प्रेक्षक आणि समीक्षकांचीही त्याला पसंती लाभली होती. आता ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ही दिवाळीच्या पाडव्याला प्रदर्शित होतोय. हाही चित्रपट हिट होणार का? या प्रश्नावर सुबोध म्हणाला की, ”हो, हा चित्रपट हाऊसफुल्ल व्हायलाच हवा. पण, माझ्यापेक्षाही जास्त तो डॉ. घाणेकरांसाठी हाऊसफुल्ल व्हावा असं मला वाटतं. कारण, घाणेकर हे असे अभिनेते होते, ज्यांच्यासाठी नेहमी हाऊसफुल्लची पाटी झळकत होती. त्यामुळे त्यांच्यासाठी हा चित्रपट हाऊसफुल्ल व्हावा, असं मला मनापासून वाटतं.” असं मत सुबोधने व्यक्त केलं आहे.

दिवाळी आणि त्याच्या एका सुंदर नात्याचाही त्याने यावेळी आवर्जून उल्लेख केला. ”माझा जन्म हा दिवाळीतलाच आहे. माझा बालगंधर्व या माझ्या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवातही माझ्या वाढदिवसादिवशी म्हणजे 9 नोव्हेंबर रोजी झाली होती. कट्यारही दिवाळीत प्रदर्शित झाला होता. त्यामुळे माझ्यासाठी दिवाळी ही नेहमीच भरभराटीची ठरली आहे.” असंही सुबोध यावेळी म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या