‘छंद प्रितीचा’ मध्ये सुबोध भावे दिसणार नवीन रुपात

सामना ऑनलाईन । मुंबई

‘हृदयांतर’, ‘तुला कळणार नाही’ अशा दरमाही एका पेक्षा एक दमदार चित्रपटांतून आपले मनोरंजन करणारे आणि सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचं व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सुबोध भावे आता लवकरच आगामी चित्रपटात आणखीन एका नवीन भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. प्रेमला पिक्चर्स निर्मित ‘छंद प्रितीचा’ या येत्या १० नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात तो ‘राजाराम’ नामक एका ढोलकी वादकाच्या आगळ्यावेगळ्या भूमिकेत आढळून येणार आहेत.

महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असलेल्या नृत्यशैलीवर आधारित ‘छंद प्रितीचा’ हा आगामी सिनेमा लवकरचं आपल्या भेटीला येणार आहे. तमाशात तन-मन-धन ओतून तो जगणाऱ्या प्रत्येक मनस्वी कलाकाराच्या जीवनाचा वेध घेणारा हा चित्रपट आहे. संगीत आणि सुबोध यांचं अतूट नातं प्रेक्षकांनी या आधी देखील ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातून पाहिलं आहे.

संगीताचा कोणताही प्रकार असो, सुबोधची त्यातील वाखाणण्याजोगी असलेली जाण या ढोलकी वादकाच्या भूमिकेच्या रुपाने प्रेक्षकांना पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. निर्माते चंद्रकांत जाधव यांच्या ‘प्रेमला पिक्चर्स’ निर्मित ‘छंद प्रितीचा’ चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन एन. रेळेकर यांनी केले असून छायाचित्रदिग्दर्शन जितेंद्र आचरेकर यांचे आहे तर संगीत दिग्दर्शन प्रविण कुंवर यांनी केलेले आहे. तेव्हा ‘छंद प्रितीचा’ जरूर पहा येत्या १० नोव्हेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.

आपली प्रतिक्रिया द्या