पंतप्रधान अहमदाबादचे नामकरण कर्णावती का करत नाही ? स्वामींचा मोदींना तिखट प्रश्न

अहमदाबादचे नाव बदलून ते कर्णावती करण्यात यावे अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी देखील ही मागणी केली होती. आता पंतप्रधान असताना त्यांनी या शहराचे नाव कर्णावती का केले नाही? असा प्रश्न भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांना पडला आहे.

स्वामी यांनी एक ट्विट केलं आहे, ज्यात त्यांनी म्हटलंय की “काल मी संपूर्ण दिवस अहमदाबादमध्ये (ज्याचं नाव अजूनपर्यंत कर्णावती करण्यात आलेलं नाही) होतो. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2013 मध्ये त्यांनी या शहराचे नाव बदलण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. मोदी पंतप्रधान झाले असून ते या शहराचे नाव बदलण्यास अद्याप तयार नाहीत.अहमदाबादमधील चारही कार्यक्रमात माझं स्वागत एखाद्या जावयाप्रमाणे करण्यात आलं.”

केंद्रामध्ये भाजप सत्तेत आल्यापासून काही शहरांची नावे बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीनुसार काही शहरांची नावे बदलण्यात आली देखील. उदाहरणार्थ अलाहाबादचे नवे नाव प्रयागराज ठेवण्यात आले, फैजाबादचे नाव अयोध्या ठेवण्यात आले. अहमदाबादचे नाव कर्णावती ठेवण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असून मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ही मागणी पूर्ण होईल अशी आशा गुजरातवासीयांना होती, जी आजपर्यंत पूर्ण झालेली नाही. मार्च महिन्यात अहमदाबादेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक बैठक पार पडली होती. या बैठकीत अहमदाबादचे नाव कर्णावती करावे अशी मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री असताना मोदी यांनी जी मागणी आग्रहाने केली होती ती मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पूर्ण का करत नाही असा स्वामींना प्रश्न पडला असून त्यांनी हा प्रश्न जाहीररित्या विचारला आहे.