उपनगर जिल्हा अजिंक्यपद वेटलिफ्टिंग – चैतन्य हेल्थ क्लबला जेतेपदाचा तिहेरी मुकुट

कोरोना संकटामुळे होऊ न शकलेली  मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धा नुकतीच गोरेगाव स्पोर्ट्स क्लबमध्ये उत्साहात पार पडली. मुंबई उपनगर जिल्हा हौशी वेटलिफ्टिंग संघटना आयोजित या स्पर्धेला गोरेगाव स्पोर्ट्स क्लबचे सहकार्य लाभले होते. स्पर्धेत ज्युनियर मुले, सीनियर मुले आणि सीनियर महिला अशा तीन गटांचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावत गोरेगावच्या चैतन्य हेल्थ क्लबने जेतेपदाचा तिहेरी मुकुट पटकावला. सीनियर मुलांत चैतन्यचा सुरेश प्रसाद ‘बेस्ट लिफ्टर’ ठरला तर सीनियर महिला गटात हा बहुमान  एम्पायर जिमच्या मानसी आहेरने ‘बेस्ट लिफ्टर’चा बहुमान पटकावला.

गोरेगाव स्पोर्ट्स क्लबच्या भव्य प्रांगणात कोरोना प्रतिबंध पाळून पार पडलेल्या या उपनगर जिल्हा  अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत जुनियर मुलांच्या गटात चैतन्य हेल्थ क्लबने 31 गुणांसह सर्वसाधारण जेतेपद मिळवले. तर 13 गुण मिळवत नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनने उपविजेतेपद पटकावले. या गटात सावरकर व्यायामशाळेचा जमील खान बेस्ट लिफ्टर ठरला. सीनियर मुलांच्या गटातही चैतन्यच्या वेटलिफ्टर्सनी वर्चस्व गाजवत 28 गुणांसह जेतेपद तर उत्कर्ष क्रीडा मंडळाने 20 गुणांसह उपविजेतेपद मिळवले. महिला खुल्या गटातही चैतन्य हेल्थ क्लबने जेतेपदाचा बहुमान मिळवला. या स्पर्धेला गोरेगाव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष डॉ. विनज जैन, जनरल सेव्रेटरी डॉ.  एम. जी. अगरवाल, कोषाध्यक्ष सुनील काबरा व आऊटडोअर चेअरमन करणसिंग वालिया, कन्वेयरव ओ.पी.के. जोसवा यांनी बहुमूल्य सहकार्य केले. त्यांचा सन्मान ‘व्यायाममहर्षी’ मधुकर दरेकर यांच्या हस्ते करण्यात आला.