मन रमवायचे प्रयोग!

48

सध्या भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा मौसम आहे तो आणखी काही काळ नक्कीच राहील. केंद्रात श्री. मोदी व महाराष्ट्रात श्री. फडणवीस हे नवनवे जादूचे प्रयोग करून दाखवीत आहेत. लोकांना या प्रयोगात मन रमवायचे आहे तोपर्यंत भाजपास विजय मिळत जाईल व कोणी कितीही गांभीर्याने काम केले तरी त्याला पराभवाची धूळ चाखावी लागेल. लोकशाहीचे सौंदर्य (Beauty of Democracy) की काय ते यालाच म्हणतात हो!

महाराष्ट्रात काँग्रेसची जागा भारतीय जनता पक्ष घेऊ लागला आहे. याचा अर्थ भारतीय जनता पक्षाचे काँग्रेजीकरण झाले असे आम्हाला म्हणायचे नाही. मात्र काही घडताना काही तरी बिघडतही असते. एकेकाळी देशात आणि राज्यांतही प्रत्येक निवडणूक काँग्रेस पक्षच जिंकत असे. कामाच्या बाबतीत ‘झीरो’, पण मतपेटीत हीरो असाच काहीसा तो प्रकार होता. महाराष्ट्रात काही प्रमाणात तसे यश भारतीय जनता पक्षाला मिळताना दिसत आहे. लातूर आणि चंद्रपूर, परभणी महानगरपालिकांच्या निवडणुकांत भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले आहे. लातूर हा अनेक वर्षे काँग्रेसचा ‘गड’ होता. विलासराव देशमुखांसारखा लोकप्रिय नेता लातूरकरांना मिळाला, पण विलासरावांच्या निधनानंतर देशमुखांची गढी कोसळली आहे. लोकसभा, जिल्हा परिषदेनंतर आता महानगरपालिका निवडणुकीतही भाजपने बाजी मारली आहे. लातूर महानगरपालिकेतील ७० जागांपैकी ३६ जागा भाजपास मिळाल्या. काँग्रेस ३३ जागांवर विजयी झाली. शिवसेनेसह इतर कोणत्याही पक्षांना लातूरकरांनी यशस्वी होऊ दिले नाही. भाजप ‘झीरो’वरून ३६ वर पोहोचला व काँग्रेसचे घोडे ३३ वर अडले. भाजपचा विजय निसटता असल्याचे सांत्वन काँग्रेसवाले करून घेत आहेत. या सांत्वनास अर्थ नाही. जेथे

भोपळा होता तेथे पूर्ण बहुमत

मिळाले. याचा अर्थ काँग्रेसच्या राजवटीस लातूरकर कंटाळले होते. शहरात पाण्यापासून स्वच्छतेपर्यंत अनेक प्रश्नांचा ‘कचरा’ वाढवण्याचेच काम काँग्रेसने केले. देशमुखांचे वारसदार धुंदीत राहिले व भाजपने सर्व आयुधांचा वापर करून मुसंडी मारली. संभाजी निलंगेकरांसारखे तरुण नेतृत्व लातुरास मिळाले. निलंगेकरांची वैयक्तिक ताकदही तोडीस तोड असल्याचा फायदा झाला. पुन्हा सत्ता असली की गुळाला मुंगळे चिकटणारच! हे सत्ताधाऱ्यांच्याच बाबतीत घडत असते. लातुरात काँग्रेसचा पराभव झाला तो त्यांच्या कर्मदरिद्रीपणामुळे. अर्थात राष्ट्रवादीच्या १३ जागा मावळत्या महापालिकेत होत्या तेथे एकावरच त्या पक्षाला समाधान मानावे लागले. शिवसेनेच्या सहा जागा होत्या. आता एकही जागा जिंकता आली नाही. याचे खापर आम्ही तुमच्या त्या ‘ईव्हीएम’ मशीनवर फोडणार नाही. मात्र जनता अशी वाहवत का चालली आहे व मराठवाड्यातील शेतकरी व तरुण वर्ग गारुडय़ांच्या पुंगीमागे का चालला आहे याचा शोध घ्यावा लागेल. परभणीत राष्ट्रवादीची सत्ता जाऊन काँग्रेसचे वर्चस्व आले आहे. ६५च्या सभागृहात काँग्रेस ३१, राष्ट्रवादी १८, शिवसेना ६, भाजप ८ असे आकडे लागले असले तरी काँग्रेसने मुसंडी मारली हे मान्य करावेच लागेल. भाजपास

लातुरात जे जमले ते परभणीत

जमू शकले नाही, पण त्यांचे दोनाचे आठ मात्र झाले. शिवसेनेच्या सहाचे सोळा झाले नाहीत. काँग्रेसने परभणीत असे कोणते दिवे लावले की मतदारांनी त्यांना हे असे भरभरून मतदान करावे? म्हणजे लातूरच्या पराभवाची भरपाई परभणीत झाली. जिह्यातील नेत्यांच्या वैयक्तिक ताकदीवर असे निकाल लागत असल्यास चंद्रपुरातही भारतीय जनता पक्षाने काँग्रेसकडून चारपट जागा हिसकावून घेतल्या. ६६च्या सभागृहात भाजपने ३६ जागा जिंकल्या. काँग्रेस २६वरून १२ वर घसरली. बसपास ८ जागा मिळाल्या. शिवसेनेस २ जागा जिंकता आल्या. सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखा ‘चंद्रपुरी’ नेता राज्याचा अर्थमंत्री आहे. काँग्रेसने इतक्या वर्षांत जो नाकर्तेपणा दाखवला त्याचे फळही भाजपास मिळाले. संपूर्ण सरकार व संघ कार्यकर्त्यांचे बळ विजयासाठी झटल्यावर ही अशी फळे मिळणारच. सध्या भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा मौसम आहे  तो आणखी काही काळ नक्कीच राहील. केंद्रात श्री. मोदी व महाराष्ट्रात श्री. फडणवीस हे नवनवे जादूचे प्रयोग करून दाखवीत आहेत. लोकांना या प्रयोगात मन रमवायचे आहे तोपर्यंत भाजपास विजय मिळत जाईल व कोणी कितीही गांभीर्याने काम केले तरी त्याला पराभवाची धूळ चाखावी लागेल. लोकशाहीचे सौंदर्य (Beauty of Democracy) की काय ते यालाच म्हणतात हो!

आपली प्रतिक्रिया द्या