नवी मुंबईच्या पहिल्या मेट्रोची यशस्वी धाव

नवी मुंबईकरांचे मेट्रोमधून प्रवास करण्याचे स्वप्न आता लवकरच साकार होणार आहे. सिडकोने घेतलेल्या आज पहिल्याच चाचणीमध्ये नवी मुंबईकरांची मेट्रो सुमारे एक किलोमीटर यशस्वी धावली. या पहिल्या चाचणीत गाडीचा वेग ताशी ६५ किलोमीटर ठेवण्यात आला होता.

नवी मुंबई मेट्रोचे काम चार टप्प्यांत होणार आहे. त्यापैकी पहिला टप्पा बेलापूर ते पेंधर हा ११ किलोमीटरचा आहे. या टप्प्यातील मेट्रो सेवा तातडीने सुरू व्हावी यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. सिडकोचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी रखडलेल्या मेट्रोच्या कामातील अडथळे शोधण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानंतर मेट्रोचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. आज मेट्रोची पहिली चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये तळोजा कारशेडपासून एक किलोमीटर अंतरावर मेट्रो धावली. ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे मेट्रोच्या आणि रखडलेल्या कामांना गती येणार आहे.

डिसेंबर २०२२ ला प्रवासी वाहतूक सुरू रखडलेल्या नवी मुंबई मेट्रोचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सिडकोने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. पहिल्या टप्प्यातील प्रवासी सेवा डिसेंबर २०२२ पर्यंत सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील रखडलेल्या स्थानकांची कामेही आता युद्धपातळीवर सुरू आहेत, अशी प्रतिक्रिया सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या