सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनामुळे निधन

5 वेळा पंढरपूरचे विधानसभेत प्रतिनिधीत्व करणारे सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे, ते 84 वर्षांचे होते. पुण्यामधील सह्याद्री रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना सोमवारी रात्री 11.30 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. परिचारक यांच्या कुटुंबातील अन्य सहा जणांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यामध्ये त्यांच्या पुतण्याचाही समावेश आहे. परिचारक यांच्यावर पुण्यामध्येच अंत्यसंस्कार करण्यात येणार  असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.

परिचारक यांनी राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष म्हणून दीर्घकाळ काम केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. 2019 सालची विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपकडून लढवली होती.

नमस्कार,

आपल्या सर्वांचे आधार, ज्येष्ठ नेते, माजी आमदार आदरणीय श्री सुधाकर पंत परिचारक यांचे काल…

Posted by Pritish Prashant Paricharak on Monday, August 17, 2020

सुधाकरपंत परिचारक यांना 5 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निदान करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुधाकरपंत परिचारक यांनी गेल्या पन्नास वर्षांमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळी उंची प्राप्त करून दिली होती. सुधाकरपंतांनी सलग पाच वेळा त्यांनी पंढरपूर तालुक्याचे विधानसभेत प्रतिनिधी केले होते. आमदार झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतांकडे डबघाईला आलेल्या एसटी महामंडळाचे अध्यक्षपद दिले.12 वर्षे पंत महामंडळाचे अध्यक्ष होते. या कालावधीत त्यांनी डबघाईला आलेले महामंडळ नफ्यात आणले.

सहकारातील डॉक्टर म्हणून त्यांची ओळख होती. अडचणीमध्ये – तोट्यामध्ये असलेले साखर उद्योग फायद्यामध्ये आणण्यामध्ये त्यांनी लौकीक प्राप्त केला होता. पांडुरंग सहकारी साखर कारखाना, पंढरपूर अर्बन बँक, भीमा सहकारी साखर कारखाना, युटोपियन शुगर , कर्मयोगी विद्यानिकेतन, पांडुरंग प्रतिष्ठान, दामाजी साखर कारखाना आणि तालुक्यातील 50 हून अधिक सोसायटी, दूध संघांचे जाळे आदींच्या माध्यमातून हजारो कुटुंबाचे संसार सुधाकरपंतांनी उभे केले होते. राजकारण, समाजकारण आणि सहकार या तिन्ही क्षेत्रात पंतांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांच्या जाण्याने पांडुरंग परिवाराचा आधारवड गेल्याची भावना व्यक्त होते आहे. सुधाकरपंत हे बालब्रम्हचारी होते. कोरोनामुळे परिचारक यांच्यावर पुणे येथेच पंचवीस लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भाजपचे आमदार प्रशांत परिचारक हा त्यांचा पुतण्या आहे.

आपली प्रतिक्रिया द्या