सुधाकर सामंत

125

<< ठसा >>  पंढरीनाथ तामोरे

पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विचारांचा प्रचार करणारे ज्येष्ठ पत्रकार आणि भक्तिपर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून सुधाकर रावजी सामंत यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने जुन्या पिढीतील एक पत्रकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. १९३२ मध्ये जन्मलेल्या सुधाकर सामंत मॅट्रिकनंतर मुंबई हिंदू विद्यापीठाच्या भाषारत्न व साहित्य सुधाकर या दोन परीक्षाही उत्तीर्ण झाले आणि राष्ट्रभाषेच्या मोफत वर्गांना हिंदी शिकवू लागले. हिंदी शिक्षक म्हणून न्यू ईरा नाइट हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षकाचे काम केले. मुंबई विद्यापीठ, निवडणूक कार्यालय, सरकारी हॉस्पिटलमध्ये कम्पाऊंडरचे काम, सेल्स टॅक्स कार्यालयात नोकरी, एका सॉलिसिटरकडे इंग्रजी टायपिस्ट म्हणून केलेले काम अशा दिवसाला तीनचार ठिकाणी लहानमोठ्या नोकऱ्या करून जे काही वेतन मिळे त्यात त्यांच्या कुटुंबीयांची उपजीविका होत होती. पुढे मुंबई येथील मंत्रालयात प्रसिद्धी विभागात काम करीत असताना ‘लोकराज्य’ या सरकारी मासिकाच्या हिंदी आवृत्तीचे सहसंपादकपद त्यांना लाभले. १८ वर्षांपर्यंत ते मंत्रालयाच्या कामकाजात रमले. त्याचदरम्यान त्यांचे वडील रावजी यांनी ‘कोकण वैभव’ हे साप्ताहिक महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या काळात ७ मे १९६० रोजी प्रसिद्ध केले. या साप्ताहिकाची संपूर्ण जबाबदारी शिरावर घेण्यासाठी सुधाकर सामंत यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि ‘कोकण वैभव’ साप्ताहिकास लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला.

या कार्याने त्यांच्या सामाजिक बांधिलकीस सुरुवात झाली. मुंबई-हिंदी विद्यापीठाचे प्रधानपद, दादरच्या वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्षपद या नात्याने त्यांची चक्रीव्याख्याने गाजू लागली. १९७५ मध्ये संतांच्या जीवनकार्याला वाहिलेल्या ‘भक्तिसंगम’ या नव्या मासिकाचा शुभारंभ त्यांनी केला. त्याशिवाय ल. के. अरावकर यांनी ‘महाराष्ट्र दर्शन’ अंकाची दोन वर्षांनंतर जबाबदारी सुधाकर सामंत यांच्याकडे सोपविली. त्यांनी ‘महाराष्ट्र दर्शन’ला त्रैमासिकाचे स्वरूप दिले. कोकणच्या सर्वांगीण विकासाला वाहिलेले ‘कोकण वैभव’ हे साप्ताहिक गेली ५८ वर्षे तर भक्तिमार्गाला वाहिलेले ‘भक्तिसंगम’ मासिक गेली ४१ वर्षे अविरत सुरू आहे. सेवाभावी पत्रकारितेबद्दल सुधाकर यांना आचार्य अत्रे पुरस्काराबरोबरच प्रगती कला मंडळ, वरळीतर्फे प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार; वृत्तपत्र लेखक संघ, दादर, मुंबईतर्फे पत्रकार द. म. सुतार यांच्या नावाचा पत्रकारिता पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले होते. श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्टचे (परेल) ते प्रमुख विश्वस्त होते. अपंग, अंध, निराधार रुग्णांच्या सेवेत आपलेपणाने ते कार्यरत असत. त्याचबरोबर श्री साईसेवा व भक्ती प्रतिष्ठान धर्मादाय ट्रस्ट, दादर या ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त या नात्याने आदिवासी मुलींचे पालकत्व, निराधार, अंध, पंगूंना कपडे व अन्नदानाचे कार्य ते करीत असत. संत गाडेगाबाबा, संतांचे चमत्कार आणि सर्व धर्म, जातींतील संतांच्या कार्यावर आधारित भक्तिमार्गाद्वारे व्याख्याने देत ते महाराष्ट्रभर फिरले. त्यांच्या संपादकीय सल्लागाराने आम्ही मराठी भाषा साहित्य  आणि दर्यावर्दी संस्कृतीला वाहिलेले एकमेव त्रैमासिक ‘दर्याचा राजा’च्या प्रथम अंकाचे प्रकाशन १५ ऑगस्ट २००८ रोजी त्यांच्याच निवासस्थानी त्यांच्या हस्ते झाले होते. सुधाकर सामंत त्यांनी अविरतपणे सुरू केलेले पत्रकारिता, साहित्य, भक्तिपर चळवळीचे कार्य खऱ्या अर्थाने पुढे नेणे हीच त्यांना आदरांजली ठरेल.

 

आपली प्रतिक्रिया द्या