सासुरवाडीच्या विकासासाठी जावायांनी दिले निधीचे आश्वासन

सामना प्रतिनिधी । हिंगोली

‘मराठवाडा ही माझी सासुरवाडी असून मराठवाड्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. औंढा नागनाथ शहराच्या पर्यटन वाढीकरिता आणि विकासासाठी १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल’, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी औंढा नागनाथ येथे बोलताना केले.

औंढा नागनाथ नगर पंचायतीच्या वतीने १२ कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमाला मुनगंटीवार यांच्यासह पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री व हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे, आमदार तानाजी मुटकुळे उपस्थित होते. यावेळी औंढा शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असं आश्वासन पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले. १० कोटी रुपये खर्चून होणाऱ्या वेगवेगळ्या कामांना सुरुवात होत असून औंढा नगर पंचायतीने शहराच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा बनवून प्रस्ताव पाठवून द्यावा, असे सांगून एकूण १५ कोटी रुपयांचा निधी औंढा शहरासाठी उपलब्ध करुन देणार असल्याचे मुनगंटीवार यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.

शिवसेनेचा बहिष्कार
औंढा नागनाथ नगर पंचायतीमध्ये शिवसेना व भाजपाची एकत्रित सत्ता आहे. मात्र, शुक्रवारचा कार्यक्रम भाजपामय करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांनी व शिवसेनेने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याची माहिती शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अनिल देशमुख यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या