भाजप अल्पमतातले सरकार बनवणार नाही! सुधीर मुनगंटीवार

1602

भाजपचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार आहेत. या भेटीपूर्वी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप अल्पमतातले सरकार कोणत्याही परिस्थितीत बसवणार नाही. स्थिर सरकार बसवण्याच्या दृष्टीनेच भाजपने वाट पाहिली आहे असे ते म्हणाले आहे. भाजप आजच सत्ता स्थापनेचा दावा करेल की नाही याबाबत साशंकता आहे. मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की ‘राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर सत्तास्थापनेचा दावा करायचा की नाही हे ठरवू’

नितीन गडकरी कधीही राज्याच्या राजकारणात परत येणारच नाही असे मुनगंटीवार यांनी ठामपणे सांगितले. गडकरी यांच्या मनात राज्यात परत येण्याचा विचारसुद्धा शिवत नाही असेही ते म्हणाले.शिवसेनेचे आमदार फोडण्याबाबत मुनगंटीवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की शिवसेनेचा आमदार हा मजबूत आहे. त्याला कोणी फोडत नाही आणि तो फुटतही नाही. सत्तास्थापनेसंदर्भात दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यात बैठक झाल्याचे वृत्त होते. मात्र अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. असं असलं तरी राज्यात शिवसेनेसोबतच युती करावी दुसरा पर्याय बघू नये अशा स्पष्ट सूचना केंद्रीय नेतृत्वाने दिल्याचे ते म्हणाले.

केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेणार असून त्यासाठी ते नागपुरात पोहोचले आहेत. नागपुरात पोहोचल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपला राज्यात यायचा विचार नाही  असे स्पष्ट शब्दात सांगितले. सरसंघचालकांशी होणारी भेट ही राजकीय नसून सत्तास्थापनेमध्ये संघाचा संबंध नसल्याचे ते म्हणाले

राज्यात शिवसेना-भाजप महायुतीचेच सरकार येईल. आमच्या मनात दुसरे काही नाही, अशी भूमिका घेत भाजपने सत्तास्थापनेसाठी जोरबैठका सुरू केल्या असून भाजपच्या हाती काय लागणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. त्याच वेळी शिवसेना मात्र आपल्या भूमिकेवर अढळ राहिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना-भाजपचे जे सूत्र ठरलेय त्यानुसार शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद द्यावे या मागणीवर शिवसेना ठाम आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली असून या बैठकीसाठी आमदार मातोश्रीवर पोहोचायला सुरुवात झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या