केवळ साखरच नव्हे तर इतर गोष्टींचेही उत्पादन घ्या –  शरद पवार

कारखान्यांनी आता केवळ साखरेचे उत्पादन करून चालणार नाही, तर इथेनॉल, वीजनिर्मितीसह इतर उपपदार्थांचे उत्पादन घेऊन ऊस उत्पादक शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या जीवनात बदल होण्यासाठी कारखानदारी चालवायची मानसिकता ठेवायला हवी, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

कुंडल येथे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड जन्मशताब्दी सांगता समारंभ, समाधीस्थळ लोकार्पण व क्रांतिदर्शी जन्मशताब्दी स्मृतीअंकाचे प्रकाशन आणि कारखान्याचा विस्तारीत गाळप हंगाम शुभारंभ अशा संयुक्त समारंभात शरद पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील, खासदार संजय पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार विश्वजित कदम, आमदार बबन शिंदे, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम सावंत, आमदार शशिकांत शिंदे, शिवाजीराव नाईक, प्रतीक पाटील, रोहित पाटील उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, ‘‘सन्मानाने जगण्याची प्रेरणा क्रांतिअग्रणी जी. डी. बापूंसारख्या माणसांनी दिली असून, स्वातंत्र्य व स्वातंत्र्यानंतरच्या काळातील त्यांचे काम प्रेरणादायी होते. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनातील अंधार दूर झाला पाहिजे, हे स्वप्न बापूंनी पाहिले होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच त्यांनी क्रांती कारखान्याची उभारणी केली. देशात या जिह्यातील कारखान्यांचा जो सन्मान होतो, यामध्ये क्रांती व सोनहिरा अग्रभागी आहेत,’’ असेही ते म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले, ‘‘1920 नंतर महात्मा गांधींनी स्वातंत्र्याची चळवळ रस्त्यावर आणली अन् जी. डी. बापूंसारख्या युवकांनी आपले वैद्यकीय शिक्षण थांबवून ही चळवळ हातात घेतली. बापूंचा लढा संपला नसून तो पुन्हा सुरू झाला आहे. वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी त्यांच्या विचाराने काम करणे गरजेचे आहे.’’