राज्यातील कापूस, भात उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर

28

सामना ऑनलाईन । नागपूर

राज्यातील कापूस, भात उत्पादक शेतकऱ्यांना अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मदत जाहीर करण्यात आली. भात उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ६८०० ते २३ हजार २५० रुपये इतकी मदत मिळणार असून कापूस उत्पादक शेतकऱ्याना ६८०० रुपयांपासून ते ३७ हजार ५०० रुपयांपर्यंत मदत जाहीर करण्यात आली असल्याची घोषणा कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विधानसभेत दिली.

राज्यातील भात उत्पादनावर तुडतुडा बसल्याने तर कापसाला बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने त्यांना नुकसानभरपाई जाहीर करावी अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांकडून करण्यात आली होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन संपण्याआधी मदत जाहीर केली जाईल असे आश्वासन दिले होते. ही मदत जाहीर करण्यात आली. यानुसार कोरडवाहू भात उत्पादक शेतकऱयांना एनडीआरएफमार्फत ६ हजार ८०० रुपये तर पीक विम्यांतर्गत १ हजार १७० रुपये मदत दिली जाईल. अशी एकूण ७ हजार ९७० रुपये मदत मिळेल. बागायत भातपिकास एनडीआरएफमार्फत १३ हजार ५०० रुपये तर पीकविम्यांतर्गत १ हजार १७० रुपये मदत दिली जाईल. अशी एकूण १४ हजार ६७० रुपये मदत बागायत भातपीक नुकसानग्रस्त शेतकऱयास मिळेल.

‘ओखी’ वादळग्रस्तांनाही मदत

‘ओखी’ वादळाने नुकसान झालेल्या फळ पिकांसाठी एनडीआरएफमार्फत १८ हजार रुपये तर विमा हवामान घटकाच्या जोखमीनुसार पीक विम्याअंतर्गत ९ हजार ते २५ हजार रुपये इतकी मदत दिली जाईल. अशी एकूण साधारण ४३ हजार रुपयांपर्यंतची मदत ओखी वादळाने नुकसान झालेल्या फळपिकांसाठी दिली जाईल. तसेच ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या भाजीपाल्यास एनडीआरएफमार्फत १३ हजार ५०० रुपये इतकी मदत दिली जाईल.

आपली प्रतिक्रिया द्या