मुखेड पोलीस ठाण्यातच पोलीसाचा आत्महत्येचा प्रयत्न

57

सामना प्रतिनिधी । मुखेड

मुखेड पोलीस ठाण्यातील एका पोलीस नायकाने आज पोलीस स्टेशन आवारात सकाळी साडेअकराच्या सुमारास विष प्राशन केल्याची घटना घडली. यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याला पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सततच्या अपमानास्पद वागणुकीला कंटाळून या पोलीस कर्मचाऱ्यांनी विष प्राशन केल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे खळबळ माजली आहे.

आज मुखेड पोलीस स्टेशनमध्ये वार्षिक तपासणी होती. यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे हे आले होते. सकाळी तपासणी संपन्न झाल्यानंतर पोलीस कर्मचारी चंद्रकांत आंबेवार यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात येऊन उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे हे मला वेळोवेळी अपमानास्पद वागणूक देत आहेत, असे सांगत प्रचंड आरडाओरड केली. त्यानंतर सोबत आणलेले विषारी द्रव्य प्राशन केले. मात्र त्याच वेळी बाजूला असलेल्या कर्मचाऱ्यांनी ते विषारी द्रव्य त्याच्या हातातून हिसकावले तरीही काही प्रमाणात ते विषारी औषध त्याच्या पोटात गेले. त्या पोलिसावर तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले.

दरम्यान, सकाळी पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश सरवदे यांनी पोलीस निरीक्षक नरसिंग आकुसकर यांच्या उपस्थितीत पोलीस नायक चंद्रकांत आंबेवार यांना महिलांच्या मंगळसूत्र चोरी प्रकरणातील तपासाबाबत जाब विचारला असता अचानक संतप्त झालेल्या आंबेवार यांनी विष प्राशन करण्याचे पाऊल उचलले. उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना आंबेवार यांनी मागील एक वर्षापासून उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे हे मला वेळोवेळी मानसिक त्रास देत आहेत. तसेच पदेपदी अपमानित करून माझे खच्चीकरण करण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे. आज सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी माझा अपमान केला. या त्रासाला कंटाळूनच मी विष प्राशन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकारानंतर पोलीस विभागात सुरू असलेला अंतर्गत विरोध चव्हाट्यावर आला. याबाबत पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या घटनेमुळे पोलिसात खळबळ माजली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या