कश्मीरमध्ये अटक केलेल्या पुण्याच्या सादियाची २०१५ सालीही झाली होती चौकशी

68

सामना ऑनलाईन, पुणे

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जम्मू-कश्मीरमध्ये होणाऱ्या पथसंचलन कार्यक्रमात आत्मघाती दहशतवादी हल्ला होणार असल्याची माहिती तिथल्या पोलिसांना गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. या माहितीनंतर अलर्टवर असलेल्या जम्मू कश्मीर पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता. पोलिसांनी तपासणीदरम्यान एका तरुणीला ताब्यात घेतलं असून ती आत्मघाती दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. धक्कादायक बाब ही आहे की ही तरूणी पुण्याची असून  २०१५ साली ती इसिसच्या प्रभावाखाली येऊन सिरीयात जाण्याच्या तयारीत होती. दहशतवाद विरोधी पथकाला याबाबतची माहिती मिळाली होती ज्यामुळे सादियाचं मनपरिवर्तन करून तिला घरी पाठवलं होतं.

पुण्यातील येरवडा परिसरातील फुलेनगर भागातील एका सोसायटीमध्ये राहणारी ही तरूणी बंडगार्डन रस्त्यावरीव ४ बोट क्लब जवळच्या एका शाळेतून १०वी उत्तीर्ण झाली आहे. २४ जानेवारीला कश्मीर रेंजचे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी पोलीस दलाला सावधानतेचा इशारा देत एक अलर्ट जारी केला होता. ज्यामध्ये आयसिसच्या संपर्कात आलेली पुण्याची एक तरूणी कश्मीरमध्ये आत्मघाती हल्ल्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं होतं. या कार्यक्रमाला येणाऱ्या महिलांची कसून तपासणी घेण्याची निर्देश देण्यात आले होते. यानुसार करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान या तरुणीला पोलिसांनी अटक केली.

या तरूणीला अटक केल्यानंतरही तिची आई आपली मुलगी दहशतवादी असल्याचं मान्य करायला तयार नाहीये. तिने प्रश्न विचारला आहे की जर एखाद्याला आत्मघाती दहशतवादी हल्ला करायचा असेल तर ती व्यक्ती रात्रीपासून त्याच जागी का थांबून राहील ? जोपर्यंत आपण कश्मीरमध्ये जाऊन पकडलेल्या तरुणीची भेट घेत नाही तोपर्यंत ती माझी मुलगी आहे की नाही हे सांगता येऊ शकत नाही असं या तरुणीच्या आईचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या