‘सुसाइड नोट’चे रहस्य

182

अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कालिखो पूल यांची तब्बल ६० पानांची ‘सुसाइड नोट’ सध्या राजकीय वर्तुळात गाजत आहे. अत्यंत गरिबीतून पुढे आलेल्या व मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या पूल यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सत्तेबाहेर जावे लागले. त्यानंतर विमनस्क अवस्थेतील पूल यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांचा मृत्यू सर्वांनाच चटका लावून गेला. मात्र पूल यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमुळे अनेक राजकारणी, उद्योगपती आणि न्यायव्यवस्थेतील अनेकांचे पितळ उघडे पडण्याची शक्यता आहे.

या सुसाइड नोटचा आधार घेऊन एफआयआर दाखल करावा यासाठी पूल यांच्या पत्नी दांगविम्साई या आपले वकील दुष्यंत दवे यांच्या मदतीने न्यायासाठी इटानगर ते दिल्लीपर्यंत खेटे मारत आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये आजवर झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल या नोटमध्ये आहे. त्यात सध्या भाजपच्या कृपेने मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसलेले प्रेमा खांडू व त्यांचे पिता दोरजी खांडू यांनी राज्याला कसे लुटले याचे वर्णन आहे, तर नबाब टुकीसारखा भ्रष्ट मुख्यमंत्री पाहिला नसल्याचे मतप्रदर्शनही असल्याचे म्हटले जाते. दिल्लीच्या सागररत्न हॉटेलमध्ये काँग्रेस नेत्यांना पार्टी फंडसाठी कसे पैसे दिले याचेही वर्णन त्यात आहे. धक्कादायक बाब म्हणजे न्यायसंस्थेतील अनेक दिग्गजांचाही पुराव्यानिशी उल्लेख या सुसाइड नोटमध्ये असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या सर्वांनी मिळून माझ्या अरुणाचलला अक्षरशः लुटले आहे अशी खंत कालिखो यांनी पत्रात व्यक्त केली आहे. अरुणाचलला चिनी ड्रगनपेक्षाही देशातील भ्रष्ट मंडळींपासून खरा धोका आहे हेच कालिखो पूल यांची सुसाइड नोट सांगते. या नोटवरचा रहस्याचा पडदा दूर होईल काय ?

आपली प्रतिक्रिया द्या