गोळवण येथे विवाहितेची आत्महत्या

मालवण तालुक्यातील गोळवण येथे जयश्री बाळकृष्ण खरात (27) या विवाहित महिलेचा मृतदेह मंगळवारी राहत्या घरी गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेबाबत अधिक तपास मालवण पोलीस करत आहेत.

मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री यांचा विवाह पाच वर्षांपूर्वी बाळकृष्ण खरात यांच्याशी झाला होता. ते दोघेच घरात राहत होते. मंगळवारी बाळकृष्ण मालवण येथे कामाकरिता गेले होते. घरी परतल्यावर त्यांना पत्नीचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांना घरातच गळफास लावलेल्या स्थितीत जयश्री यांचा मृतदेह दिसला.

या प्रकरणाबाबत पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, रुक्मांगद मुंडे आदी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. जयश्री यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात होते. अधिक तपास पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलीस करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या