मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष संभाजी गोविंदराव जाधव यांची आत्महत्या

नांदेड येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष संभाजी गोविंदराव जाधव यांनी मंगळवारी  सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. बँकेचे मोठे कर्ज झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

शहरातील तरोडानाका परिसरातील राजेशनगर भागात मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष संभाजी गोविंदराव जाधव हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. पहाटेच्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती कळताच भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिरुध्द काकडे व अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. जाधव यांच्या आत्महत्येचे वृत्त समजताच मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकत्र्यांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली. व्यवसायाने शेतकरी असलेल्या संभाजी जाधव यांच्यावर मोठे कर्ज झाले होते. शेतीचे कर्ज वाढल्यानेच त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या