पित्यासह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू, आईची विहिरीत आत्महत्या

धुळ्यात रागाने केला कुटुंबाचा घात

सामना ऑनलाईन । धुळे – क्रोधाग्नी उसळला की तो संपूर्ण कुटुंबालाच कसे भस्मसात करतो याचे प्रत्यंतर देणारी मन सुन्न करणारी घटना धुळे जिल्ह्यात शिंदखेड तालुक्यात म्हळसर येथे शनिवारी रात्री घडली.

आसाराम भिल व पत्नी विठाबाई यांच्यात रात्री ९ वाजता कडाक्याचे भांडण झाले. दोघांचीही समजूत काढण्याचा प्रयत्न मुलांनी केला; पण त्याला न जुमानता आसाराम लोहमार्गावर जीव देण्यासाठी गेले. त्याचदरम्यान अहमदाबाद-नागपूर प्रेरणा एक्सप्रेस ही रेल्वे वेगाने जात होती. लोहमार्गावर उभ्या असलेल्या वडिलांना सावरण्याचा प्रयत्न मुले शिवदास (२१), विनोद (१८) यांनी केला; पण काळ बनून आलेल्या या रेल्वेखाली बापलेक चिरडले गेले.

यादरम्यान आईनेही गावच्या विहिरीत उडी घेतली. या गडबडीत आईचा हात पकडलेली वैशाली (२०) हीही विहिरीत पडली. तिला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले आहे; मात्र आईचा मृत्यू झाला आहे.