‘न्यूड’ व ‘सेक्सी दुर्गा’ला इफ्फीतून वगळलं, सुजोय घोष यांचा राजीनामा

239

सामना ऑनलाईन । मुंबई

गोव्याला होणाऱ्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून (इफ्फी) मराठी चित्रपट ‘न्यूड’ आणि मलयाळम चित्रपट ‘सेक्सी दुर्गा’ला वगळल्यामुळे या महोत्सवाच्या निवड समितीचे अध्यक्ष व प्रसिद्ध दिग्दर्शक सुजोय घोष यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या आठवड्यात माहिती व प्रसारण मंत्रालयाने इफ्फी महोत्सवातून या दोन चित्रपटांना वगळल्याची घोषणा केली होती.

गोव्यात २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव साजरा होणार आहे. सुजोय घोष यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या महोत्सवात दाखवल्या जाणाऱ्या २६ चित्रपटांची यादी माहिती व प्रसारण मंत्रालयाला दिली होती. त्यात ‘न्यूड’ आणि ‘सेक्सी दुर्गा’चा समावेश होता. या महोत्सवाची सुरुवात मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ‘न्यूड’ चित्रपटाने करण्याचा निर्णय सुजोय घोष यांनी घेतला होता. मात्र माहिती व प्रसारण मंत्रालयाने निवड समितीला पाठवलेल्या यादीतून ‘न्यूड’ व ‘सेक्सी दुर्गा’ या दोन्ही चित्रपटांना वगळण्यात आले होते. मंत्रालयाच्या या निर्णयामुळे नाराज झालेल्या घोष यांनी निवड समितीपदाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

‘न्यूड’ आणि ‘सेक्सी दुर्गा’ या चित्रपटांची निवड समितीचे अध्यक्ष सुजोय घोष यांच्यासह इतर सदस्य निशिकांत कामत, निखिल अडवाणी, अपूर्वा असरानी, राहुल रवैल, गोपी देसाई या सर्वच निवड समितीच्या सदस्यांनीही या मुक्तकंठाने स्तुती केली होती. असे असतानाही प्रसारण मंत्रालयाने या चित्रपटांच्या नावावर व त्यातील विषयांवर आक्षेप घेत हे चित्रपट महोत्सवातून वगळले. प्रसारण मंत्रालयाच्या या निर्णयाबद्दल ‘न्यूड’चे दिग्दर्शक रवी जाधव आणि ‘सेक्सी दुर्गा’चे दिग्दर्शक सनलकुमार ससीधरन यांच्यासह अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या