केजरीवाल, सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी माझ्या वाढदिवसाला गाणी गायली, महाघोटाळेबाज सुकेशचा दावा

दिल्लीच्या तुरुंगात कैदेत असलेल्या महाघोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर याने पुन्हा एक चिठ्ठी लिहिली आहे. ही चिठ्ठी त्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लिहिली असून यामध्ये त्याने सध्या अटकेत असलेले केजरीवाल यांच्यासह त्यांचे निकटचे नेते मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्यावर आरोप केले आहेत. या चिठ्ठीमध्ये सुकेश याने आरोप केला आहे की केजरीवाल यांनी सिसोदिया आणि जैन यांच्यासोबत मिळून गरीब मुलांच्या शिक्षणासाठीच्या पैशांचा घोटाळा केला आहे. सुकेश याने आरोप केला आहे की दिल्लीतील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी टॅबलेट दिले जाणार होते. यासाठी सुकेश चंद्रशेखर याच्या माध्यमातून एका चिनी कंपनीसोबत सौदा करण्यात आला होता. मात्र दुसऱ्या कंपनीने 20 टक्के जास्त कमिशन देण्याची लालूच दाखवल्याने हे कंत्राट सुकेशकडून काढून दुसऱ्या कंपनीला देण्यात आलं होतं.

सुकेश याने आरोप केला आहे की विविध कंत्राटे देऊन अरविंद केजरीवाल यांनी 1 हजार कोटी रुपयांचे कमिशन घेतले आहे. 25 मार्च 2017 रोजी सुकेशचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यावेळी केजरीवाल, सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी मिळून ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ हे गाणं गायलं होतं. पैशांच्या लालसेपायी त्यांनी मैत्री तोडली आणि कंत्राट दुसऱ्याला दिलं असा आरोप सुकेशने केला आहे. मला घोटाळेबाज म्हटलं जातं मात्र सगळ्यात मोठे घोटाळेबाज हे केजरीवालचे असल्याचा आरोप सुकेशने केला आहे.