गडचिरोलीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या 27 झाली, कुख्यात सुखलाल परचापीचाही खात्मा

गडचिरोलीत नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या 27 झाली आहे. या चकमकीत सुखलाल परचापी याचाही खात्मा झाला आहे. सुखलालचा मृतदेह महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील घनदाट जंगलात मर्दीनटोला भागात सापडला आहे. 13 नोव्हेंबर रोजी झालेल्या चमकमकीत पोलिसांच्या C60 दलाने 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. यामध्ये नक्षलवाद्यांचा म्होरक्या मिलिंद तेलतुंबडे याचाही खात्मा करण्यात आला होता.

चकमकीनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराची बारकाईने पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान सुखलाल याचा मृतदेह दोन दगडांमध्ये अडकलेल्या अवस्थेत दिसून आला होता. परचापी याला काही महिन्यांपूर्वी दंडकारण्य विशेष विभागीय समितीमध्ये बढती देण्यात आली होती. सुरुवातीला पोलिसांना वाटलं होतं की चकमकदरम्यान परचापी पळून गेला असेल, मात्र पोलिसांच्या एका गोळीने अचूक वेध घेत परचापीला खलास केला होता.

गडचिरोलीमध्ये महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील नक्षलवादी इतक्या मोठ्या प्रमाणावर का जमले होते, याचं कारण अजून पोलिसांना कळू शकलं नाहीये. मंगळवारी पोलिसांनी 7 मृत नक्षलींची ओळख पटवली. यामध्ये मिलिंद तेलतुंबडे याच्या आणखी एका अंगरक्षकाचा समावेश आहे. सोमदा उर्फ नरेश उईका असं या नक्षलवाद्याचं नाव आहे. यापूर्वी पोलिसांनी तेलतुंबडे याच्या दोन अंगरक्षकांची ओळख पटवली होती. आतापर्यंत एकूण 23 नक्षलवाद्यांची ओळख पटली असून यातील 14 नक्षलवादी हे छत्तीसगडचे आहेत. 4 नक्षलवाद्यांची ओळख पटवणं अद्याप बाकी आहे. पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या तपशीलाच्या आधारे आणि छत्तीसगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवली जात आहे. पोलिसांनी 7 नक्षलवाद्यांचे मृतदेह त्यांच्या घरच्यांकडे सुपूर्द केले आहेत. उरलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आले आहेत.