चंद्रशाळेची सुलूमावशी

135

विजया वाड

सुलभा देशपांडे… अक्षरशः असंख्य मुली त्यांच्या हाताखालून येऊन मान्यवर झाल्या. उद्याच्या त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त जागविलेल्या आठवणी….

चंद्रशाळा – स्वप्नशाळा असं जिचं वर्णन करता येईल अशा या स्वप्नाचे १९८० ते २००० या वीस वर्षांच्या कालखंडाचे आम्ही किती पालक साक्षीदार आहोत! ‘दुर्गा झाली गौरी हे नृत्यनाटय़ तेव्हा सुलभा देशपांडे नि अरविंद देशपांडे साकारत होते. दिग्दर्शक होते गुरू पार्वतीकुमार. आता नृत्यक्षेत्रात मोठे नाव कमावलेली संध्या पुरेचा तेव्हा ‘दुर्गा’चा पहिला चेहरा होती. उर्मिला मातोंडकर, निशिगंधा वाड, सुकन्या कुलकर्णी, किशोरी शहाणे, शर्वरी पाटणकर, शिल्पा नवलकर, यतीन कार्येकर अशी ७५ बालके त्या नृत्यनाटय़ात सहभागी होती. पुढे कलाकार म्हणूनच त्यांनी नाव कमावले आणि त्या सर्वांची लाडकी ‘सुलूमावशी…’ ए सुलूमावशी! (मावशीला कोणी ‘अहो’ म्हणतं का?). नात्यातला तो गोडवा जपत सुलभा देशपांडे यांनी एक अपूर्व नृत्यनाटय़ उभे केले. ‘बेणारेबाई’ची अपूर्व भूमिका करणाऱया सुलभा देशपांडे तिथे प्रेमळ मूर्ती बनून मुलींमध्ये मिसळत. अभिनेत्रीचा मुखवटा बाजूस काढून.

गतवर्षी सुलभाताई गेल्या तेव्हा त्यांचा सुपुत्र निनाद म्हणाला, ‘‘आईचा मी एकटा मुलगा नव्हतो. तिला शंभर मुलीही होत्या. त्या साऱयांना तिला अखेरचा निरोप देऊ दे. मगच तिची अंत्ययात्रा निघेल.’’ किती खरे होते ते!

निशिगंधाला अभिनयाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आणि गुरू सुलभा देशपांडे लाभल्या. तेव्हापासून आमचा दर आठवडय़ाला सहप्रवास चालू झाला. निशू केवळ ११  वर्षांची होती म्हणून मीही तिजसोबत सुलभाताईंकडे जात असे. घर मोगल लेनमध्ये माहीमला गंगाविहार हॉटेलपाशी चौथ्या मजल्यावर होते. लिफ्ट नव्हती, पण तरुणपणी त्याचे काही वाटायचे नाही.

त्या वेळेस नाटकाची थिअरी पक्की व्हावी म्हणून आम्ही ‘स्टॅनस्लाव्हस्की’ नि ‘बोलेस्लाव्हस्की’ कोळून प्यायलो. ‘मी निशूला शिकवितेय तेव्हा तू बाहेर बसू नकोस. तुझेही ज्ञान वाढेल अशी थोर माणसे आम्ही अभ्यासत आहोत.’ या त्यांच्या सांगण्यावरून मीही ‘शिकवणी’त सामील होत असे.

‘दुर्गा’च्या प्रयोगाबरोबर सुलूमावशीही मुलींसोबत असे. प्रयोग अगदी ‘आनंदवन’, तद्नंतर ‘दिल्ली’… इतक्या लांबवरही झाले. पण साथसंगत सुटली नाही. प्रयोग पंचवीस वर्षे होत आले. त्यातल्या ‘चिमण्या’ बदलत गेल्या, पण सुलूमावशी तीच राहिली. आमचे नातेही दृढ राहिले. निशूने बीएपर्यंत (इयत्ता 6वीपासून) ही शिष्यवृत्ती टिकविली. त्यामुळे सुलभाताईंचा प्रदीर्घ सहवास आम्हांस लाभला आणि एक नाते दृढ झाले. आंतरिक प्रेम वाढत राहिले. निशिगंधाला सुलूमावशीने अनेक चांगली नाटके दिली.

‘‘आपला एखादा कपडा फाटला, उसवला तर आपण कुठे बाहेर धावतो का? नाही ना? कारण घरात सुई, दोरा, कात्री एवढे नक्की असते. खरं ना? तसंच एखादा शब्द अडला, त्याची विशेष माहिती हवी असली तर घरी विश्वकोश असू दे. जे जे विश्वी नोंदले ते ते विश्वकोशी गोंदले एवढे ध्यानी ठेवा!’’ असं म्हणत त्या मग आजीच्या भूमिकेत शिरत. ‘‘मीही ज्ञानाची भूक भागविणारा हा सुंदर विश्वकोश घरी बाळगते. माझ्या नातवंडासाठी. तुम्हीही घ्या मराठी विश्वकोश.’’ अशी ही जाहिरात बाईंनी विश्वकोशाच्या प्रभादेवीच्या ऑफिसमध्ये केली. त्याचे जे चिमुकले मानधन आम्ही त्यांना दिले त्याचेही त्यांनी ग्रंथ आमच्याकडून मूल्य देऊन खरेदी केले. सीडी विकत घेतली.

आनंदी स्वभाव, संयत व्यक्तिमत्त्व आणि गर्वभार उतरून ठेवलेली वृत्ती अशी बाईंची प्रतिमा. सतत काम करणे त्यांना आवडे. सर्वांना त्या हव्याहव्याशा वाटत. आमची जाहिरात दूरदर्शनवर झळकली तेव्हा बाईंचा आवर्जून फोन आला. इतकी ऋजुता त्यांच्या ठायी होती.

माझ्या नि निशूच्या कोणत्याही जाहीर कार्यक्रमात सुलभाताई मोठय़ा आनंदाने येत. बालकोशाच्या उद्घाटनास १५ डिसेंबर २०१५ रोजी त्या आवर्जून आल्या होत्या. बाईंना अल्झायमरचा त्रास सुरू झाला होता. त्यांच्या वाढदिवशी त्यांना फोन केला, तेव्हा म्हणाल्या, ‘‘हल्ली माझ्या लक्षात राहत नाही गं विजया. त्रास होतोय विस्मरणाचा.’’

फेबुवारी २०१६ मध्ये मात्र निनादने फोन घेतला. थोडंसंच बरं नव्हतं, पण बोलत्या चालत्या होत्या. ३ मे २०१६. निनादचा फोन.

‘‘आईला भेटायला ये, तिला बरं नाही.’’

मी ४ मे रोजी लगेच गेले. त्या टीव्ही बघत होत्या. जवळ केअरटेकर होती. सून आदिती मायेने जवळ होती. मी बाईंशी बोलत होते, पण त्यांच्या अंतरापर्यंत काही पोहोचत नव्हते. डोळय़ांत ओळखच दिसेना. मन थरकले. बालकोश उद्घाटनाचे नितीन गडकरी-साहेबांसोबतचे त्यांचे फोटो दाखवले… पण डोळय़ांत भाव उमटले नाहीत.

‘‘मला ओळखलं का?’’ ‘‘विजया’’ बस्! दृष्टी पुन्हा चलतचित्रांवर. मी निराश. परतले झाले.

४ जून २०१६… बाई नाहीत!

आता उरल्या आठवणी अन् उरले चित्ति जिव्हाळे,

कोण किती ‘उरले’ ते आजही कोणासि ना कळे… हेच खरे.

आपली प्रतिक्रिया द्या