सुमन संचित

ज्योत्स्ना गाडगीळ, jyo.gadgil@gmail.com

जुन्या पिढीकडून आलेलं संचित नवी पिढी तितक्याच आनंदात आणि उत्साहात जोपासते, सादर करते…

‘कोणत्याही गायकाला आपण गायलेली गाणी ‘गुणी’ गायकांच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकायला मिळणे, ही सांगितिक मेजवानी असते. आज सायंकाळी ती संधी मलाही मिळणार आहे, ‘संगीत रजनी’च्या माध्यमातून!’ सांगत आहेत, अत्यंत गोड गळ्याच्या, सात्विक भाव असलेल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायिका सुमन कल्याणपूर.

सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याकडे वाटचाल करणाऱया सुमनताईंचा नुकताच ऐंशीवा वाढदिवस झाला. त्यानिमित्त ‘सा’ क्रिएशनतर्फे शीव येथील षण्मुखानंद ऑडिटोरिअम येथे सायंकाळी संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन आनंद सहस्रबुद्धे करणार असून मंगला खडिलकर सूत्रसंचालन करणार आहेत. उत्तरा केळकर, साधना सरगम, माधुरी करमरकर, अर्चना गोरे, विद्या करलगीकर, मंदार आपटे आणि आताच्या नवोदित गायिका मुग्धा वैशंपायन, आर्या आंबेकर सुमनताईंची गाणी सादर करणार आहेत.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुग्धा पहिल्यांदाच सुमनताईंना भेटणार असल्याचे तिने सांगितले. ‘सा रे ग म प’ लिटल चँपमध्ये असताना तिने निवड फेरीच्या वेळी ‘छान छान छान मनी माऊचे बाळ’ आणि सुमनताईंचे ‘आकाश पांघरूनी’ हे गाणे म्हटले होते. ते परीक्षकांना खूप भावले. त्यावर तिची निवड झाली. शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केल्यावर तिची सुरांची जाण आणि गाण्याची समज परिपक्व होऊ लागल्याने तीच गाणी आता आणखी चांगल्या पद्धतीने सादर करता येत असल्याचे मुग्धा सांगते. ती म्हणते, ‘या कार्यक्रमात ‘वाट इथे स्वप्नांची संपली जणू’, ‘मधुवंतीच्या सुरांसुरांतून’ ही सुमनताईंनी गायलेली गाणी मी म्हणावीत, असा निरोप त्यांनी मंगला खाडिलकर यांच्याकडे दिला. ती गाणी मी वारंवार ऐकली. गाण्याचे भाव बारकाईने ऐकले. सुमनताईंच्या आवाजातील हळुवारपणा माझ्या आवाजात नाही, पण तो प्रयत्नपूर्वक आणण्याचा मी सराव केला आहे. शास्त्रीय संगीत आणि नाटय़संगीत यासाठी माझ्या आवाजाला रसिकांची पसंती मिळत असली तरी मला चौकटीत अडकून न राहता विविध प्रकारची गाणी म्हणायची आहेत. सुमनताईंच्या गाण्याबाबतीतही माझा तोच प्रयत्न असणार आहे. सुमनताईंना आजवर कधीच प्रत्यक्ष भेटले नाही किंवा त्यांच्याशी संवाद झाला नाही, कार्यक्रमाच्या निमित्ताने हा अपूर्व योग जुळून येणार असल्याचा मला आनंद आहे.’

मुग्धाप्रमाणे आर्यादेखील सुमनताईंना पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेटणार आहे. तिनेही ‘सा रे ग म प’च्या एका एपिसोडमध्ये सुमन ताईंचे ‘रिमझिम झरती श्रावणधारा’ हे गाणे म्हटले होत़े  त्यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ती सुमनताईंचे गाणे सादर करणार आहे.

आर्या आणि मुग्धा यांना अतिशय कमी वयात मोठे व्यासपीठ मिळाले. मात्र सुमनताईंनी १७ व्या वर्षी पहिल्यांदा पार्श्वगायन केले होते. आर्या आणि मुग्धा या दोघींची गाणी आपल्याला जुन्या दिवसांचे स्मरण करून देतील, असे सुमनताई सांगतात. त्या म्हणतात, ‘आम्ही बालपणी केवळ आवड म्हणून शेजारच्यांकडे रेडियोवर गाणी ऐकायचो. ते गाणे कोण म्हणत आहे, त्या गाण्याचे भाव काय आहेत हे कळण्याचे ते वयही नव्हते. फक्त ती सुरावट मनाला रुंजी घालत असे. शाळेत जायला लागल्यावर हळूहळू सुरैय्या, शमशाद बेगम, गीता रॉय या गायिकांची नावे कळू लागली. त्यांची गाणी गुणगुणू लागले.  मुंबईत आल्यावर गाण्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतले. बंगाली, ओडिशी, पंजाबी, राजस्थानी, कानडी, भोजपुरी या भाषांतूनही गाणी म्हटली. आताचा काळ बदलला आहे. आजच्या पिढीचे मला अतिशय कौतुक वाटते. तिला संगीताची चांगली जाण आहे. एवढा मोठय़ा वाद्यवृंदाच्या ठेक्यावर आपण गायलेली गाणी मला ऐकायला मिळणार याबद्दल मी अतिशय उत्सुक आहे.’

सुमनताईंचा हाच साधेपणा रसिकांना भावतो. तोच त्यांच्या गाण्यांतूनही आढळतो. ‘जीवनात ही घडी’, ‘एकदाच यावे सखया’, ‘केतकीच्या बनी तिथे’, ‘नाविका रे’, ‘चल उठ रे मुकुंदा’, ‘तुझ्या कांतीसम रक्तपताका’, ‘निंबोणीच्या झाडामागे’, ‘ॐकार प्रधान’  यासारख्या ‘सुमन’ संगीताने आपले भावविश्व व्यापलेले आहे.