अभिनेता सुमीत राघवन साकारणार डॉ. लागू यांची भूमिका

सामना ऑनलाईन । मुंबई

आपल्या नावावर नाटकाकडे गर्दी खेचून आणणारे आणि ज्यांच्या प्रवेशाच्या वेळी टाळ्यांच्या कडकडाटाने सभागृह दणाणून सोडणारे मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर यांना लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या ‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटा अभिनेता सुबोध भावे घाणेकरांची भूमिका साकारणार आहेत. मात्र, आता या बहुचर्चित चित्रपटातील एक एक व्यक्तिरेखा उलगडायला लागल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच सुबोध भावे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून आपला चित्रपटातील लूक शेअर केला होता. त्या लूकला प्रेक्षकांची चांगलीच पसंती लाभली आहे. आणि आता अभिनेता सुमीत राघवन यांनीही आपल्या सोशल मीडियावरून त्यांचा चित्रपटातील आपल्या भूमिकेचा लूक शेअर केला आहे. नटश्रेष्ठ घाणेकर यांच्यासारखीच लोकप्रियता लाभलेले ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांच्या भूमिकेत सुमीत दिसणार आहेत. या भूमिकेआधी डॉ. लागू यांना भेटण्याची संधी मिळाल्याचंही सुमीत यांनी आपल्या भावनाही पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत.

सुमीत राघवन यांच्यासह अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही या चित्रपटात दिसणार आहेत. मात्र, त्यांच्या भूमिकेबद्दल अद्याप खुलासा झालेला नाही. अभिजीत देशपांडे दिग्दर्शित ‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ ७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.