भटकंती सुट्टीतली!

>> रतिंद्र नाईक

सुट्टी लागली… ऊनही तापतंय. पण तरुणाईची भटकण्याची हौस कशी मागे राहील. चला पाहूया जवळची ठिकाणं.

माथेरान
कर्जत तालुक्यातील माथेरानला जाताना टॉय ट्रेनने होणारा दोन तासाचा प्रकास स्मरणीय असतो. विविध पक्षी, माकडे आणि हिरव्यागार डोंगरांची समृद्धी सभोवती असल्याने हा प्रवास संपूच नये असे वाटते. सोबत पॅनोरमा, गॅरकॅट अलेक्झांडर, वन ट्री हील असे विविध पॉईंट पर्यटकांना आकर्षित करतात. मुंबई किंवा पुण्याहून माथेरानला जाताना कर्जतपर्यंत रेल्वे अथवा लोकलने जावून तेथून नेरळला लोकलने जावे लागते. नेरळहून टॉय ट्रेन अथवा खाजगी टॅक्सीने जाता येते. ऑक्टोबर ते मे हा कालावधी भेट देण्यासाठी अत्यंत योग्य असा असतो.

तुंगारेश्वर अभयारण्य
वसईतील पूर्वेला तुंगारेश्वर अभयारण्य वसले असून या अभयारण्याला भेट दिल्यास निश्चितच शहरापासून दूर निसर्गाच्या कुशीत गेल्याचा आस्वाद पर्यटकांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. रंगीबेरंगी पक्षी तसेच वन्यजीवही पर्यटकांना या अभयारण्यात पाहायला मिळतील. याशिवाय तुंगारेश्वर येथे शिवशंकराचे मंदिर असून ही वास्तूही पाहण्यासारखी आहे.

माहीमचे नेचर पार्क
मुंबईतील काँक्रीटच्या जंगलात हिरवळ अद्यापही शिल्लक असून निसर्गाच्या सान्निध्याचा आस्वाद मुंबईकरांना या सुट्टीत घेता येईल. माहीमचे नेचर पार्प सुमारे ३७ एकरवर पसरले असून या नेचर पार्पमध्ये पर्यटकांना नक्कीच रंगीबेरंगी पक्षी, फुलपाखरू तसेच सरपटणारे प्राणी पाहता येतील याशिवाय औषधी वनस्पतीही याठिकाणी उपलब्ध असून त्याची माहिती मुंबईकरांना घेता येईल.

वाघोबा खिंड
पालघर जिल्ह्य़ातील मनोरपासून ८ ते १० किमी अंतरावर वाघोबा खिंड आहे. सर्वत्र हिरवळ आणि येथील शंकराचे मंदिर पर्यटकांना आकर्षित करते. शिवाय रंगीबेरंगी पक्षी आणि माकड मोठ्य़ा प्रमाणात येथे पाहायला मिळतील.

काशीद किनारा
महाराष्ट्राला देखणा समुद्रकिनारा लाभला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत शरीराची होणारी काहिली थांबावण्यासाठी मुंबईकरांना या किनाऱ्यांचा पर्याय उरतो अलिबाग नजीकच काशीद समुद्रकिनारा असून पर्यटकांना येथे दिवसभर एन्जॉय करता येईल या शिवाय काशीद किनाऱयावरच्या उपहारगृहांमध्ये चमचमीत मासळीवर ताव मारता येईल.

राजमाची किल्ला
मुंबईपासून अवघ्या काही तासांवर असलेल्या खोपोली आणि खंडाळा घाटादरम्यानच राजमाची किल्ला असून हा ऐतिहासिक किल्ला समजला जातो. किल्ल्यावर शंकराचे पुरातन मंदिर असून या मंदिराची वास्तू पाहण्यालायक आहे याशिवाय येथील वातावरणही कोरडे असल्याने किल्ल्यावर चढताना पर्यटकांना सहसा थकवा जाणवत नाही. किल्ल्यावरून दरी आणि खोपोली व आजूबाजूच्या परिसराचे विहंगमय दृष्य पर्यटकांना न्याहाळता येईल.