नवनीत राणा यांना समन्स बजावले, याचिकाकर्ते सुनील भालेराव यांची माहिती

143

सामना प्रतिनिधी, अमरावती

खासदार नवनीत रवी राणा यांच्या अमरावती लोकसभा मतदारसंघ निवडणुकीतील विजयाला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झाल्या आहेत. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ व सुनील भालेराव यांनी स्वतंत्ररित्या या याचिका दाखल केल्या आहेत. मंगळवारी या याचिकांवर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान नागपूर खंडपीठाने खासदार नवनीत कौर राणा यांना समन्स बजावले असल्याचे याचिकाकर्ते सुनील भालेराव यांनी म्हटले आहे. येत्या चार आठवड्यात खासदार नवणीत राणा यांना समन्सचे लेखी उत्तर उच्य न्यायालयात हजर राहून द्यावयाचे आहे, असे याचिकाकर्ते सुनील भालेराव यांनी सांगितले.

अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. अपात्र “लुभणा ” जातीच्या असलेल्या नवनीत कौर यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरला आणि त्या विजयी झाल्या असं याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी असे करून मागासवर्गींचा संवैधानिक अधिकार  हिरावून घेतला असल्याचा आरोप याचिकांमध्ये करण्यात आला आहे, त्यामुळे नवनीत कौर राणा यांची निवड रद्द ठरवावी अशी मागणी याचिकांद्वारे करण्यात आली आहे.

राणा यांनी नोकरीसाठी जे जात प्रमाणपत्र काढले होते, त्या जात प्रमाणपत्राच्या आधारे लोकसभा निवडणूक लढवली, असा आरोपही या याचिकांमध्ये करण्यात आला आहे. या आरोपांच्या पुष्टीसाठी पुरावा म्हणून पंजाब सरकारच्या महसूल सचिवांनी केंद्रीय अनुसूचित जाती आयोगासमोर सादर केलेल्या नवनीत राणा यांच्या लुभाणा जातीचे प्रमाणपत्र जोडण्यात आले आहे. या याचिकांवर सुनावणी करताना नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती ए. झेड. हक्क यांनी खासदार राणा यांना न्यायालयात हजर राहून स्वतःची बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत. नवनीत कौर राणा यांना बजावलेल्या समन्सवरील कारवाई अमरावती जिल्हा न्यायालयाद्वारे होणार आहे असे भालेराव यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या