रात्रीचा ‘सूर्य’

78

[email protected]

काही वेळा काळोख्या रात्री आकाश उजळलेलं पाहून प्राचीन रोमन साम्राज्यातल्या आकाशदर्शन करणाऱ्या लोकांना वाटायचं हा रात्रीचा सूर्य (नॉक्टर्नल सन) आहे. त्यानंतर जगभरातून अनेक वर्षे आकाश – अभ्यासकाना या ‘उजळत्या’ रात्री चकवा देत राहिल्या. काय असावं यामागचं गूढ? काळय़ा रात्री चांदणं म्हणावं तर चंद्र आकाशात नाही आणि असंख्य ताऱ्यांचा मंद प्रकाश म्हणावा तर तो शुभ्र नाही. हिरवा, लाल, किरमिजी रंगांचा प्रकाश बघता-बघता क्षितिज व्यापून टाकताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटायचं. संशोधकांचं कुतूहल जागृत व्हायचं, परंतु या रात्रीच्या ‘प्रकाशा’वर कोणी प्रकाश टाकू शकलं नव्हतं.

आता कॅनडातील यॉर्क विद्यापीठाच्या वातावरण संशोधकांनी कृत्रिम उपग्रहांनी पाठवलेली माहिती (डेटा) संकलित करून या उजळ रात्रीचा तपास लावला आहे.

अगदी इसवी सनापूर्वीपासून या अजब उजळ रात्रींचे उल्लेख आढळतात. प्लिनी यांनी दोन हजार वर्षांपूर्वीच ‘भररात्री दिवस उगवल्यासारखा उजेड’ असं या ‘ब्राइट नाइटस्’चं वर्णन केलं. त्यानंतर १७८३ आणि १९०८ मध्येही या उजळ रात्रीचे उल्लेख सापडतात.

एडिसनने विद्युत दिव्यांचा शोध लावण्यापूर्वीच्या काळात जगभरचं आकाश रात्री काळशार आणि हजारो ताऱ्यांनी खच्चून भरलेलं दिसायचं. आजही क्वचित एखाद्या दूरस्थ खेडय़ात निरभ्र रात्री त्याचा प्रत्यय येतो, परंतु जगातल्या बहुतेक मानवी वस्त्या विजेने उजळल्यामुळे रात्रीची आकाशीची दौलत दुर्मिळ झाली आहे.

याबाबत संशोधन करणारे शेफर्ड म्हणतात की, मी स्वतः कधी अशी उजळलेली रात्र अनुभवलेली नाही. मात्र १९९१ मध्ये त्यांनी हवेचा उजळपणा (एअरग्लो) मोजणारं उपकरण बनवलं. ते उपग्रहावर बसविण्यात आलं होतं. त्याच्या ‘डेटा’चा अभ्यास करताना असं लक्षात आलं की, पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या थरातील प्राणवायूची संयुग सूर्याच्या अतिनील (अल्ट्राव्हायलेट) किरणांमुळे विभक्त होऊन त्याचं एकेका अणुत रूपांतर होतं. रात्री त्यांची पुनश्च जुळणी होते आणि त्यातून बाहेर पडणारी ऊर्जा अवकाशात हिरव्या रंगाची उधळण करते. हाच रात्रीचा सूर्य असतो.

वातावरणाच्या वरच्या थरातील तरंगळही एकमेकांना सुपरइम्पोज करतात आणि ‘एअरग्लो’ अनेकपदरी दिसतो. मात्र अशा ‘रात्रीचा सूर्य’ फार मोजक्या ठिकाणी कमी वेळ (सात टक्के) दिसतो. जिथे कृत्रिम प्रकाशाचं बिलकूल प्रदूषण नाही अशाच ठिकाणी तो दिसू शकतो.

परंतु उजळत्या जगात सारी रात्र लखलखीत करण्याचा चंग माणसाने बांधला असल्याने यापुढे खेडोपाड्यांतूनही प्रकाश – प्रदूषणमुक्त आकाश दिसणं कठीण. चांगले ठळक तारेही हुडकताना अशा ठिकाणी सोपं नसतं तर ‘रात्रीचा सूर्य’ मानला जाणारा हिरवट प्रकाश कुठला दिसायला! आपण निसर्गाची फुकट मिळणारी नेत्रसुखद दृश्यं आपल्याच हाताने घालवत आहोत, दुसरं काय!

आपली प्रतिक्रिया द्या