सनबर्नचा धांगडधिंगा परवानगीशिवाय, महसूल विभागाच्या पत्रामुळे धक्कादायक बाब उघड

सामना ऑनलाईन।पुणे

पुण्याजवळ हवेली तालुक्यात केसनंद या गावात सनबर्न फेस्टीव्हलचा धांगडधिंगा हा कोणत्याही परवानग्यांशिवाय आयोजित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं महसूल विभागाच्या एका पत्रावरून स्पष्ट झालंय. या कार्यक्रमाला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध करत आज पुण्यामध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत या संघटनांनी अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित करत सरकारला जाब विचारला होता. त्यानंतर महसूल विभागाने सनबर्नच्या आयोजकांना एक पत्र पाठवलं आहे.

letter-new-site

महसूल विभागाने पाठवलेल्या या पत्रात १२ विविध प्रकारच्या परवानग्या सरकारकडे जमा झालेल्या नाहीत असं स्पष्टपणे लिहलंय. इतकंच नाही तर कोणत्या परवानग्या घेतलेल्या नाहीत त्याची यादीच जोडली आहे. या परवानग्या उद्यापर्यंत सादर करण्यात आल्या नाही तर कार्यक्रमाची परवानगी रद्द होण्याची शक्यता आहे.

फेस्टीव्हलच्या नावाखाली व्याभिचाराचा अड्डा बनलेल्या सनबर्नविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आवाज बुलंद केला आहे. सनबर्नमध्ये तरूणाईला वाममार्गाला लावलं जातंच आहे शिवाय यामध्ये मोठा आर्थिक घोटाळा देखील असल्याचा आरोप करण्यात आला आहे.  पुणे इथे हिंदुत्ववादी संघटनांनी पत्रकार परिषदेत घेतली. या पत्रकार परिषदेत हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक आणि अन्य मंडळी सहभागी झाली होती.

abhay-vartak-newकेंद्र सरकारने ५० हजार रूपयांपेक्षा जास्तची रक्कम बँक खात्यात भरल्यास चौकशी केली जाईल असा आदेश काढला होता. जो नंतर मागे घेण्यात आला. मात्र खात्यात पैसे भरल्यास चौकशी होणार आहे या सनबर्नची ५० हजारांपेक्षा जास्तची तिकीटं घेतल्यास कोणतीही चौकशी होणार नाही हा काय प्रकार आहे असा विचार करायला लावणारा सवाल या हिंदुत्ववादी संघटनांनी विचारला आहे.

मावळमधील भूमीपुत्र शेतकऱ्यांनी हक्कासाठी संघर्ष केला तर त्यांच्यावर गोळीबार झाला, आणि दुसरीकडे सनबर्नसारख्या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या तथाकथित फेस्टीव्हलला विनापरवानगी कार्यक्रम आयोजित करू दिला जातो हा काय प्रकार आहे असं या हिंदुत्ववादी संघटनांनी विचारलं आहे. या पत्रकार परिषदेमध्ये काही महत्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले, ते प्रश्न आपण पाहूयात

‘सनबर्न’च्या आयोजकांनी कोणतीही परवानगी नसतांना कुठल्या आधारे तिकीटविक्री चालू केली? 

या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत का देण्यात आलेली आहे ?

‘सनबर्न’ नेमकी किती तिकीटे विकली ?

सनबर्नची तिकीटे कोणाला विकली गेली?  

या तिकीटांवर शासनाला किती करमणूक कर भरला?

या कार्यक्रमाला ग्रामपंचायतीची अनुमती नाहीये. तसंच कोणत्याही प्रशासकीय परवानग्या न घेता अनधिकृतरित्या या कार्यक्रमाचं आयोजन केल्यानं सरकारने सनबर्नला परवानगी देऊ नये अशी मागणी या हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे.