ट्रम्प सरकारच्या मुस्लिम राष्ट्रांविरोधी धोरणावर गुगलची टीका

51
donald-trump

सामना ऑनलाईन वृत्त । सॅन फ्रान्सिस्को

सात मुस्लिम राष्ट्रांमधील नागरिकांना व्हिसा न देण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतल्यानंतर त्यांच्यावर टीका सुरू आहे. अनेकांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी देखील नव्या व्हिसा धोरणाविरोधात निषेध नोंदवला असून आपल्या ट्रॅव्हलिंग स्टाफला तडकाफडकी अमेरिकेत परत बोलावले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिमविरोधी भूमिका आपल्या प्रचारसभेतच स्पष्ट केली होती. त्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ट्रम्प यांनी वादग्रस्त मुद्द्यांवर काम करण्याचा धडाका लावला आहे. शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या नव्या धोरणानुसार ७ मुस्लिमबहुल देशांतील नागरिकांना ३ महिने व्हिसा न देण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर गुगलने नाराजी व्यक्त करित या धोरणाचा निषेध नोंदवला. ट्रम्प यांच्या नव्या धोरणामुळे कंपनीच्या १८७ कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसणार आहे. तसेच यामुळे अमेरिकेत टॅलेंट येण्यास एकप्रकारे मोठा अडथळा निर्माण होईल, असे सुंदर पिचाई यांनी म्हटले आहे. पिचाई यांच्यासोबतच फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग आणि नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाई यांनीही डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या धोरणाचा निषेध केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या