एनडीएच्या बैठकीसाठी अजितदादा गटाने पक्षाचा वर्धापन दिन पुढे ढकलला; 10 जून रोजी सुनेत्रा पवार, तटकरे, पटेल दिल्लीला जाणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एनडीएच्या बैठकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा  वर्धापन दिन पुढे ढकलण्यात आला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे एनडीएच्या बैठकीसाठी 10 जून रोजी दिल्लीला जाणार असल्याने पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी 10 जून रोजी एनडीएच्या घटक पक्षांची महत्त्वाची बैठक नवी दिल्लीत बोलावली आहे. या बैठकीला देशभरातील एनडीएचे सर्व प्रमुख घटक पक्ष, त्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. महायुती आणि एनडीएचा एक भाग म्हणून या बैठकीला उपस्थित राहणे अत्यंत आवश्यक असल्यानं, 10 जून रोजीचा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वर्धापन दिन सोहळा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. 11 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात वर्धापन दिनाचा सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.