सुनील गावसकर-अजित वाडेकर आमने सामने

सामना ऑनलाईन । मुंबई

उत्साह… खुन्नस… प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवल्याचा आनंद… शिवाजी पार्क जिमखाना व दादर युनियन या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांच्या क्रिकेट लढतींची ही स्टोरी. या दोन संघांमधील चुरस पुन्हा एकदा तमाम मुंबईकर क्रिकेटप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे. शिवाजी पार्क जिमखान्याच्या पुढाकारामुळे येत्या २३ डिसेंबर रोजी शिवाजी पार्क जिमखाना व दादर युनियन यांच्यामध्ये एका स्पेशल लढतीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दादर युनियनकडून सुनील गावसकर आणि शिवाजी पार्क जिमखान्याकडून अजित वाडेकर खेळणार आहेत. याचसोबत या दोन संघांमधील माजी खेळाडूंची उपस्थितीही या लढतीला असेल. त्यामुळे आपसूकच जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे.

जवळपास अडीच वर्षांपूर्वी दादर युनियनच्या वतीने अशा प्रकारच्या लढतीचे आयोजन करण्यात आले होते. आता शिवाजी पार्क जिमखान्याच्या कार्यकारिणीने दोन क्लबमधील लढतीचे आयोजन केले आहे. या बहुप्रतीक्षित लढतीत दोन संघांमधील माजी दिग्गज खेळाडू क्रिकेटच्या रणांगणात उतरणार आहेत. त्यामुळे येत्या शनिवारी शिवाजी पार्कमध्ये क्रिकेटप्रेमींची झुंबड उडेल यात शंका नाही. लढतीनंतर दोन्ही संघांतील खेळाडू सुखद स्मृतींना उजाळा देतील. प्रवीण अमरे, अविनाश कामत, संजीव खानोलकर, सुनील रामचंद्रन यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्यांनी या लढतीच्या आयोजनासाठी कंबर कसली आहे.