सीरियातील धुमश्चक्री, महासत्तांचे राजकारण

168

<< डॉ. वि. ल. धारुरकर >>

मध्यपूर्वेतील अनेक राष्ट्रे अंतर्गत यादवी युद्धामुळे जळत आहेत, उद्ध्वस्त झाली आहेत. मागे काही वर्षांत या सर्व देशांमध्ये लोकशाही प्रस्थापनेसाठी आंदोलने झाली. क्रांतीची फळे प्रतिक्रांती खाऊन टाकते. तसे मध्यपूर्वेत घडून आले आहेत. सीरियामधील यादवी युद्ध हे महाभयानक विनाशकारी ठरले आहे. आजवर २१ व्या शतकाने अनुभवलेले हे संहारक युद्ध असून, त्यामध्ये सामान्य प्रजा होरपळत आहे. ती निर्वासित म्हणून देशोधडीला लागली आहेत. लेबनॉन व जॉर्डन या शेजारी राष्ट्रांच्या आश्रयासाठी निर्वासित बनून ते महाकठीण जीवनास सामोरे जात आहेत. ‘दोघांचे भांडण तिसऱयाचा लाभ’ या म्हणीप्रमाणे सीरियामधील अंतर्गत यादवीचा लाभ घेऊन अमेरिका व रशिया या गरम तव्यावर स्वार्थाच्या भाकऱया भाजण्यात दंग आहेत. पण सीरियामधील निष्पाप सामान्य माणसाच्या प्रश्नांकडे मात्र कोणाचेही लक्ष नाही, याची खंत वाटते. सीरिया ही जगामधील एक भूमी असून मानवी समूहांनी नवाश्म युगातून तेथे वसाहती केल्या होत्या. मेसोपोटेमियन, बाविलिनिया व ग्रीक संस्कृतीचे अवशेष या भूमीत सापडतात. दमाकत ही सीरियाची राजधानी असून, भौगोलिक दृष्टीने समृद्ध असा हा कृषिप्रधान देश आहे. लेबनॉन, जॉर्डन, तुर्कस्तान आणि इस्रायलच्या सीमा त्याच्या सभोवती आहेत. बहुसंख्य प्रजा मुस्लिमधर्मीय असून, ख्रिश्चन व अन्य समुदाय तेथे राहात होते. १९७० ते २००० पर्यंत बश्युअल अमद यांचे पिता हफीन अल अमद यांचे तेथे राज्य होते. २००० नंतर बशर अमद सत्तेवर आले व चार राजकीय गटांचा विरोध असूनही ते सत्तेवर टिकून आहेत. २०१६ च्या निवडणुकीतही त्यांनी आपली सत्ता टिकवून ठेवली आहे. सीरियामधील गेल्या पाच वर्षांची यादवी युद्धे आणि सततच्या हिंसाचारामुळे सीरिया उद्ध्वस्त झाला आहे, पोखरून निघाला आहे. अंतर्गत युद्धे आणि यादवीला कंटाळून तेथील लोक युरोपच्या भूप्रदेशात पोलंड, जर्मनीकडे आश्रयासाठी धाव घेत आहेत. मानवतेच्या पातळीवर त्यांचा प्रवेश रोखू नका अशी शांततापूर्वक भूमिका पोपने घेतली आहे. सीरिया संयुक्त राष्ट्रसंघाचा संस्थापक सदस्य आहे आणि अलिप्त राष्ट्रचळवळीतील एक महत्त्वाचा भागीदार आहे. तेलसाठे आणि खनिज संपत्तीमुळे या भूमीमध्ये हस्तक्षेप करून तेथील सत्तेला वश करण्याच्या बडय़ा राष्ट्रांचा प्रयत्न राहिला आहे.

असद यांचे पक्के स्थान

सीरियामध्ये अनेक गट-तट व पक्ष आहेत. सध्याचे सत्ताधारी असद आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी आटापिटा करीत आहेत, तर बंडखोर गट त्यांना सत्तेवरून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. रशिया व चीन असदच्या बाजूने उभे आहेत, तर अमेरिका बंडखोरांच्या पाठीशी आहे. त्यांना शस्त्रास्त्र व निधी पुरविण्यामध्ये अमेरिका सर्वात पुढे आहे. युद्धामुळे सीरियाचे अर्थकारण उद्ध्वस्त झाले आहे. तसेच तेथील शिक्षणव्यवस्था संपूर्णपणे कोलमडली आहे. जीवन वाचविण्यासाठी घरदार, मालमत्ता सोडून लोक सीमा ओलांडून शेजारी राष्ट्राकडे धाव घेत आहेत. आपण कधी आपल्या देशात परतू, याची त्यांना खात्री वाटत नाही. अनिश्चितता आणि भविष्याची चिंता या भोवऱयातून ते कधी बाहेर पडतील, ते सांगता येणार नाही. असद बंडखोर नागरिकांविरुद्ध रासायनिक शस्त्र वापरत आहेत. याबद्दल अमेरिकेने आक्षेप घेतला आहे. सीआयए बंडखोर स्वातंत्र्ययोद्धय़ांना प्रशिक्षण देत आहे. बंडखोर आणि सत्ताधारी असद यांच्यातील संघर्ष सामान्य जनतेचे जीवन उद्ध्वस्त करीत आहे व त्यांना निर्वासित बनून शेजारी राष्ट्रांकडे धाव घ्यावी लागत आहे.

गेल्या र् वर्षांमध्ये या देशामध्ये अस्थिरता व अस्वस्थता वाढली आहे. सत्ताधारी व विरोधी गटात ४ तुकडे करण्यात आले आहेत. अमेरिकेसारखे राष्ट्र बंडखोरांना शस्त्र व पैसा पुरवीत आहे. अमेरिकेच्या प्रारंभिक वित्तसाह्यामुळे बगदादी आपले स्थान बळकट करू शकले. आता ते त्यांची ताकद खुद्द अमेरिकेच्या विरोधातही वापरण्यास सज्ज झाले आहेत.

यादवीचा भयावह वणवा

२०११ पासून सीरियामध्ये युद्धजन्य परिस्थिती उद्भवली आहे. अल कायदाचा एक गट येथे राज्य करू लागला. शिया असदच्या बाजूने तर सुन्नी बंडखोरांच्या बाजूने आहेत. प्री सीरियन आर्मीला अमेरिकेचा पाठिंबा आहे, तर रशिया असदच्या बाजूने उभा आहे. सारे राजकारण तेलाभोवती फिरत आहे. कोण कोणाचा मित्र व कोणाचा शत्रू आहे, हे कळायला मार्ग नाही. अशा विचित्र अवस्थेतून सीरिया जात आहे. लाखो लोक बेघर झाले आहेत. सदर असद यांचा तराजू आज जड आहे. पण उद्या काय घडेल, ते सांगता येणार नाही. सीमेवरील तुर्की व रशियात युद्धबंदी झाली असली तरी युद्धाने उद्ध्वस्त झालेल्या या पाच हजार वर्षे जुन्या शहराची एवढी वाताहत झाली आहे की, त्यांचे पुराण वास्तूंचे संवर्धन ही मोठी जटिल समस्या बनणार आहे. दमाकत, अलप्पो व इतर अनेक सीरियन शहरांमध्ये नवाश्मयुगीन तसेच बाबेलोरियन व सुमोरियन तसेच ग्रीक संस्कृतीचे अवशेष आहेत. प्राचीन ग्रीक खुली रंगभूमी तसेच आरंभीच्या ग्रीक रंगभूमीचे अवशेष व जीवनोपयोगी वस्तूंची अजोड परंपरा तेथे आहे. युद्ध आणि हिंसाचाराच्या तडाख्यात या सांस्कृतिक अवशेषांची वाताहत होत आहे. केमिकल जैविक शस्त्र्ााच्या वापरामुळे हजारो निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत, ही यादवी मानवी संस्कृतीच्या इतिहासातील काळाकुट्ट कालखंड होय.

आयएसआयएसचे जाळे

सद्दाम हुसेनच्या पराभवानंतर २०११ मध्ये अमेरिकेने माघार घेतली. बगदादी अल कायदा, इराकचे प्रमुख होते. इराकमध्ये आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न बगदादीने केला. इस्लामिक स्टेट ऑफ इराकचे जनक बगदादी मजबूत झाले. त्यानंतर बगदादी यांनी सीरियाकडे वळविले. आपल्या संघटनेच्या नावात त्यांनी सीरियाचा समावेश केला. तसेच सौदी इस्रायली बंडखोरांना शस्त्र दिली. त्यात अमेरिकेनेही भर टाकली. जगातील सर्वात मोठी धोकादायक संघटना म्हणून बगदादीचा उदय झाला. सीरियाच्या स्वातंत्र्यलढय़ात लढणारे बंडखोर बगदादीचे समर्थक बनले. अमेरिकेचा डाव तिच्यावर उलटला. बगदादीकडे अपार सत्ता व संपत्ती, शस्त्र कुठून आली? कुराण आणि कतारसह आयएमआयच्या ४० देशांकडून निधी प्राप्त होतो. शिवाय रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी जी-२० राष्ट्रांपैकी काही राष्ट्रे बगदादीला झुकते माप देतात, याकडे लक्ष वेधले होते.२०१४ मध्ये इराककडे ६०० मिलियन डॉलर मालमत्ता होती. २०१४ मध्ये १० मिलियन डॉलर मिळविले होते. विदेशी पर्यटकांना वेठीस धरून त्यांनी डॉलर्सचा साठा वाढविला. या संघटनेकडे ३० ते ३५ हजार सैन्य आहे. १५ देशांतील बंडखोर त्यांच्या सैन्यात समाविष्ट आहेत. प्रत्येक सैनिकाला ५०० ते ८०० डॉलर्स वेतन दिले जाते.

एका दिवसाला सीरियामध्ये अमेरिकेला ९००० मिलियन डॉलर्स खर्च करावे लागत आहेत यावरून या खर्चाचा आवाका लक्षात येतो. हे सारे तेलविहिरीवर ताबा मिळविण्याचे राजकारण आहे. इस्रायलच्या शेजारी राष्ट्रांमध्ये सतत युद्धे व्हावीत व इस्रायलला सुरक्षित ठेवण्यासाठी ती आवश्यक आहेत, असे अमेरिकन धुरिणांना वाटते. एडवर्डन सुरेन यांनी म्हटल्याप्रमाणे इराकमध्ये बगदादीची शक्ती इस्रायल आणि अमेरिकेने प्रथम वाढविली. तेलाच्या राजकारणात बगदादीचा उदय झाला. बगदादी अमेरिकेचा गुणम राहील, असे वाटले होते. पण त्यांनी अमेरिकेसह जगाला हादरवून टाकले आहे. आता बगदादी अमेरिकेलाही आव्हान देत आहेत.

बगदादी आता इराक व सीरियातील प्रमुख शहरे आपल्या ताब्यात घेऊन बगदादकडे सरसावला आहे. इराकप्रमाणेच त्यांनी सीरियावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले तर काय होईल? इस्लामिक स्टेट ऑफ इराक ऍण्ड सीरिया जर एकत्रपणे उभे राहून पश्चिम आशियात मजबूत बनले तर बगदादी संपूर्ण जगाला आव्हान देऊ शकतील.

उद्ध्वस्त सीरियाचे चित्र

गेल्या ५ वर्षांत युद्धे सुरू झाल्यापासून सीरियात ४५ हजार लोक मारले गेले आहेत. हा आकडा हिरोशिमाएवढा आहे. १० लाख सीरियन जखमी झाले आहेत तर १२ दशलक्ष सीरियन निर्वासित झाले आहेत. सीरियामध्ये लोकशाही आंदोलन चालू असताना असद सरकारने लढाऊ तरुणांची क्रूर हत्या केली व आंदोलन चिरडून टाकले. त्यामुळे बंडखोरांना सहानुभूती वाढत गेली व असद अंधकाराकडे वाटचाल करू लागले. सीरियातील यादवी ही २१ व्या शतकातील महासंहारक व तेवढीच थरारक ठरली आहे. २०१५ मध्ये रशियाने दहशतवादी गटाविरुद्ध बॉम्बहल्ले सुरू केले. असद सरकारचे समर्थन करीत रशियाने केलेल्या या हल्ल्यात हजारो निष्पाप लोक प्राणास मुकले. इराण, अफगाण, लेबनॉनमधील लोकही असदच्या बाजूने लढत आहेत. २०१५ च्या ऑक्टोबरमध्ये सीरियन बंडखोरांना अमेरिकेने प्रशिक्षण देण्याची मोठी रक्कम खर्ची झाली. सीरियामधील रशियन हस्तक्षेपास तुर्कस्तानचा विरोध आहे. रशियन राजदूताची तेथे गोळय़ा घालून हत्या करण्यात आली.

नोव्हेंबर २०१६ मध्ये सीरियाने रशियाच्या मदतीने अलप्पोवर चढाई करून अलप्पोच्या पूर्व प्रांताकडील ९८ टक्के भाग त्यांनी काबीज केला आहे. त्याशिवाय असद सरकारच्या ताब्यात राजधानी दमास्करत, लेबनॉन, सीरिया सीमा व उत्तर पूर्वेकडील सागरी टापूवर आहे, तर बंडखोरांचे वर्चस्व हे तर उरलेला सीरिया हा बंडखोर व बगदादीचा ताब्यात आहे. प्री सीरियन आर्मीमध्येही बरेच अंतर्गत मतभेद आहेत. त्यातही संघर्ष होतात व हानी होते. अशा ३-४ गटांवर आता अल-कायदाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. इराकच्या बाजूने सीरियाच्या उत्तर व पूर्व भागात बंडखोरांनी हातपाय पसरले आहेत. त्यासाठी ते सोशल मीडियाचाही वापर करीत आहेत. तुर्की सेनेने प्री सीरियन आर्मीच्या मदतीने ताबा घेण्याचा प्रयत्न केला.

सीरियन युद्धाने शेजारी राष्ट्रांपुढे निर्वासित समस्या उभी केली आहे. लेबनॉन, तुर्कस्तान व जॉर्डनसमोर निर्वासितांचे प्रचंड लोंढे उभे आहेत. अधिक सुरक्षेतही काही अस्वस्थ सीरियन लोक युरोपच्या सीमारेषांवर चालत आहेत. लेबनॉन या छोटय़ा राष्ट्रामध्ये त्याच्या लोकसंख्येएवढे निर्वासित आले आहेत. त्यामुळे त्याची अर्थव्यवस्थाही दारुण संकटात सापडली आहे. जॉर्डनही याच प्रकारे निर्वासितांच्या वादळी संकटाला सामोरे जात आहे.

पुनर्बांधणीची जटिलता

युद्धामुळे सीरिया संपूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. हजारो लोक जीव मुठीत धरून स्थलांतरित झाले आहेत. अन्य देशांत मोलमजुरी करून पोट भरत आहेत. याशिवाय सीरियन प्रजेचा वाली कोण आहे? रस्ते उखडले आहेत, इमारती कोसळल्या आहेत आणि शिक्षण आरोग्य व सुरक्षा कागदावर आहे. विधवा, अपंग, निराश्रित बालकांचे पुनर्वसनही डोकेदुखी ठरणार आहे. सीरियातील बालतरुण पिढी युद्धाने पार कोमेजून गेली आहे. सीरियाची विस्कटलेली घडी कशी बसविणार, हा खरा प्रश्न आहे. बशर अल असद पायउतार व्हायला तयार नाहीत, ते सत्तेला घट्ट चिकटून आहेत. रशियाला ते अधिक डाफरत आहेत.

अमेरिका बंडखोरांना छुपा व उघड पाठिंबा देत आहे. महासत्ता एकमेकांच्या पायात पाय घालून डावपेच आखत आहेत. त्यांचे राजकारण होते, पण बिचारी निष्पाप सीरियन जनता मात्र नाहक भरडली जात आहे. दुसऱया महायुद्धाची  भूमिका घेणार असेल तर सीरियासारख्या दुर्दैवी छोटय़ा राष्ट्राने काय करावे? त्यांच्या अंधारलेल्या जीवनामध्ये आशेचा किरण कधीतरी दिसेल की नाही, हा खरा प्रश्न आहे.

सुर आणि असुर या प्रवृत्तीमधील हा संघर्ष सीरियाच्या युद्धक्षेत्रावर दिसून आला. ग्रीक संस्कृतीच्या प्रभाव काळात या भूमीला सुरभूमी म्हटले जात असे. सुर आणि असुर यातील संघर्ष या भूमीत प्राचीन मध्ययुगीन व आता आधुनिक काळातही दिसून येतो. सीरियातील असुर प्रवृत्तीचा नाश होऊन तेथे शांततापर्व उदयास कधी येणार? या शापित भूमीला दुष्टचक्रातून मुक्त कोण करणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे भविष्यकाळच देईल. तूर्त तर सीरिया हा महासत्तांच्या दुष्ट राजकारणाचा आखाडा झाला आहे. या मांजराच्या बेडक्यांच्या गळय़ात घंटा कोण बांधणार? याची चिंता वाटते.

संयुक्त राष्ट्रसंघ व्हेटो पॉवरमुळे महासत्तांच्या हातचे बाहुले बनत आहे. अलिप्त राष्ट्रांची चळवळही दुबळी झाली आहे. अशावेळी आशियातील सीरियासारख्या राष्ट्राचे प्रश्न कोण सोडविणार, त्यांच्या पुनर्बांधणीकडे कोण लक्ष देणार? साम्यवादी चीन आणि निराश अस्थिर रशिया आणि अमेरिकेकडून काय अपेक्षा करणार? हिंदुस्थानसारख्या अलिप्त राष्ट्र चळवळीतील प्रमुख राष्ट्राने पुढाकार घेऊन अफगाणिस्तान… सीरियासारख्या दुभंगलेल्या राष्ट्रांची पुनर्बांधणी करण्यामध्ये पुढाकार घ्यावा. त्यामुळे उद्ध्वस्त सीरियाची पुनर्बांधणी करताना ३ पैलूंवर भर द्यावा लागेल. काही भागांमध्ये झालेली युद्धबंदी सर्व भागात लागू करावी. उद्ध्वस्त रस्ते, वाहतूक  दूरसंदेशवहन व्यवस्था पुनःप्रस्थापित करावी. निर्वासितांना मायदेशी आणून त्यांच्या पुनर्वसनाची योजना तयार करावी. महासत्तांच्या भयावह राजकारणाची कटू फळे म्हणजे आजच्या उद्ध्वस्त सीरियाचे विषण्ण करणारे चित्र होय. या राष्ट्राच्या प्रश्नाकडे बिगरराजकीय आणि मानवी दृष्टीने पाहायची गरज आहे. अलिप्त राष्ट्राचा नेता या नात्याने हिंदुस्थानने पुढाकार घेऊन अशा राष्ट्राच्या पुनर्वसनाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

समारोप

इस्लामिक ब्रदरहूड तसेच बंडखोर गट, आयएमआयएमचे वाढते जाळे तसेच अमेरिका व रशियाचे ‘प्यादे’ ठरलेले नेते व त्यांच्या महत्त्वाकांक्षांचे संघर्ष यामुळे प्रश्न बिकट होत आहेत. युद्धामुळे प्रश्न सुटत नाहीत ते अधिक बिकट होतात, हे सीरियातील यादवीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

जर्मनीहून सीरियाकडे शांतता मोर्चा निघाला आहे. सध्या तातडीची गरज आहे ती सीरियामध्ये युद्धबंदीची व शांतता प्रस्थापनेची. तुर्की सैनिकाला जिवंत जाळल्याची घटना आयएमआयने दाखविली. अशा प्रकारची अमेरिकी कृत्ये घृणास्पद व निषेधार्ह आहे. संयुक्त राष्ट्राने व झालेल्या चळवळीने सीरियातील घटनांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. जीवित व वित्तहानी ही उभ्या जगासाठी हानीकारक आहे. या यादवी युद्धामुळे अपरिमित हानी झाली आहे. जगात यापुढे अशी यादवी युद्धे होऊ नयेत, अनेक देश व जनता त्यामुळे उद्ध्वस्त होऊ नये म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेने केवळ बघ्याची भूमिका घेऊ नये.

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या