२६ बाळांची सुपरमॉम

36

<योगेश नगरदेवळेकर>

जगातील ७० टक्के वाघ फक्त हिंदुस्थानात आढळतात. वाघांच्या अनिर्बंध शिकारीमुळे वाघांची भूमी असलेल्या या हिंदुस्थानात जेमतेम १४०० वाघ शिल्लक राहिले आहेत. सरकारने यात लक्ष घातले आणि वाघांची संख्या वाढायला सुरुवात झाली. २०१४  मध्ये हीच संख्या २२०० वर आली आणि २०१६ मध्ये २५००चा टप्पा ओलांडला. ही संख्या चांगली नसली तरी समाधानकारक आहे.

हे सगळं आठवायचं कारण म्हणजे परवाच पेंच व्याघ्र प्रकल्पातून एक बातमी आली की, ‘कॉलरवाली’ने नुकताच चार पिलांना जन्म दिला आहे.

आतापर्यंत या ‘कॉलरवाली’ने २६ पिलांना जन्म दिला आहे. त्यामुळे ती सध्या वाघिणींमधली सुपरमॉम ठरली आहे. मध्य प्रदेशातील सिवनी जिल्हय़ात असलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील १२ वर्षांची ही वाघीण सातव्यांदा आई झाली असून यावेळेस तिने चार पिलांना जन्म दिला आहे. वनरक्षक गस्त घालत असताना ही वाघीण त्यांना चार बछडय़ांसोबत फिरताना दिसली आणि ही आनंदाची बातमी सगळय़ांना समजली.

टी-१५ या टेक्निकल नावाने  तिच्या गळय़ात पहिल्यांदाच रेडिओ कॉलर लावली गेली. त्यामुळे ‘कॉलरवाली’ या नावानेही ही वाघीण प्रसिद्ध आहे.

२००६ मध्ये सगळय़ात पहिल्यांदा तिने तीन बछडय़ांना जन्म दिला. पण ती पिलं अल्पावधीतच मृत्युमुखी पडली. २००८ ते २०१३ दरम्यान कॉलरवालीने एकूण १८ पिलांना जन्म दिला. त्यातील १४ जिवंत राहिले.

वाघ झाला म्हणून काही त्याला जंगलातील जीवनाच्या झगडय़ातून सुटका मिळत नाही. वाघाच्या पिलांनासुद्धा इतर प्राण्यांकडून खाल्ले जाण्याचा धोका असतोच.

गर्भधारणा झाल्यावर वाघीण साधारण १६ आठवडय़ांच्या कालावधीनंतर  ३ ते ४ बछडय़ांना जन्म देते. पिले जन्मतः अतिशय नाजूक आणि अंध असतात, तर वाघाच्या तडाख्यात ही पिले सापडली तर तो त्यांना ठार मारतो म्हणून या काळात मादी अतिशय आक्रमक असते. ती पिलांना सगळय़ांपासून लपवून ठेवते. या काळात वाघीण त्यांच्यासाठी शिकार करून आणते व त्यांना भरवते.

पिले साधारण तीन-चार महिन्यांची झाली की, वाघीण त्यांना आपल्याबरोबर शिकार कशी करतात हे दाखवण्यासाठी घेऊन जाते. वाघ दोन वर्षांचा होईपर्यंत स्वतंत्र शिकार करू शकत नाही.

एकदा का ही पिलं मोठी झाली की, वाघिणीपासून दूर जातात. वाघ स्वतःचे क्षेत्र शोधतो, तर मादी जवळच्या एखाद्या गटात सामील होते. मादी वाघ आपल्या बछडय़ांना घेऊन कधी कधी आईच्या भेटीला येते. एक नवीन सुरुवात होते.

‘कॉलरवाली’च्या या पिलांमुळे पेंचमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अशीच वाघांची संख्या वाढत जावो हीच सगळय़ांची इच्छा आहे.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या