पोलीस अधीक्षक संजय जाधव यांचा शानदार निरोप समारंभ

1128

नांदेडहून बदली झालेले पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना कर्मचाऱ्यांच्या वतीने निरोप देण्यात आला. यावेळी संजय जाधव यांना भावना अनावर झाल्या होत्या. जनतेची आणि कर्मचाऱ्यांची कामे करुन मी ताठ मानेने आणि समाधानाने जात आहे, याचा मला अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले.

संजय जाधव यांची बदली मुंबईत झाली असून, त्यांच्या जागी विजय मगर यांनी पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे शनिवारी हाती घेतली. संजय जाधव यांचा निरोप समारंभ आणि विजय मगर यांचे पदग्रहण हे दोन्ही समारंभ पोलीस मुख्यालयातील हॉलमध्ये संपन्न झाला.

संजय जाधव म्हणाले की, जनता पोलिसांच्या कामाचे मूल्यमापन करीत असते. जनतेचे सहकार्य हवे असेल तर मानवता दृष्टीकोनातून प्रत्येक माणसाशी सौजन्याने वागले पाहिजे. मी एका पोलिसाचा मुलगा आहे, याचा मला अभिमान वाटतो. पोलिसाच्या मुलाला आपल्या खात्यामध्ये लाईनबॉय असे म्हणतात. तो लाईनबॉय मी असल्यामुळे मला त्याचा अभिमान आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत बोलताना ते म्हणाले की, माझ्याकडे बदल्यांसाठी ५५० जणांचे अर्ज आले होते. त्यापैकी बरेच अर्ज मी निकाली काढले आहेत. आता उर्वरित अर्ज नवे पोलीस अधीक्षक निकाली काढतील. तथापी गणेशोत्सव आणि निवडणूका आल्यामुळे त्यांना अर्ज निकाली काढण्यासाठी घाई करणे योग्य होणार नाही.

नवे पोलीस अधीक्षक विजय मगर यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, पोलीस म्हणून, माणूस म्हणून ते असामान्य व्यक्तीमत्व (आऊटस्टँडींग पर्सनॅलिटी) आहेत. त्यांच्यासोबत मी काम केले आहे. कामाशी काम हे त्यांचे तत्व आहे. कामामध्ये कोणतीही तडजोड ते सहन करत नाहीत. सहकार्याने उद्देशून ते म्हणाले, जे प्रेम तुम्ही मला दिले, जे सहकार्य तुम्ही मला केले तेच प्रेम आणि सहकार्य विजय मगर यांना द्या.

आपली प्रतिक्रिया द्या