सुपरस्टार मेस्सीची 35वी विक्रमी ‘हॅटट्रिक’, रोनाल्डोला टाकले मागे

बार्सिलोनाचा स्टार लिओनेल मेस्सी याने ‘ला लिगा’ या प्रतिष्ठेच्या यूओपिअन लीग स्पर्धेत आपली 35 वी विक्रमी हॅटट्रिक नोंदवत पोर्तुगालचा सुपरस्टार रोनाल्डोला मागे टाकले. रोनाल्डो सध्या युवेंटस् क्लबचे प्रतिनिधित्व करतोय. मेस्सीच्या विक्रमी हॅटट्रिकच्या बळावर बार्सिलोनाने आपल्या होमग्राऊंडवरील लढतीत आरसीटी मालोर्का क्लबला 5-2 असे सहज पराभूत केले. मेस्सीने लढतीच्या 17 व्या, 41 व्या आणि 83 व्या मिनिटाला गोल नोंदवत अफलातून हॅटट्रिक साकारली.

अर्जेंटिनाचा सुपरस्टार मेस्सी हा युरोपच्या टॉप फाइव्ह स्पर्धांत गेल्या 14 हंगामात दहाहून अधिक गोल करणारा जगातला पहिला फुटबॉलपटू ठरला आहे. याच महिन्यात 2 डिसेंबरला सहाव्यांदा ‘बॅलॉन डी ओर’ किताब पटकावत जगातला सर्वश्रेष्ठ फुटबॉलर हा किताबही मेस्सीने आपल्या नावावर केला आहे. शनिवारच्या महत्त्वपूर्ण ला लिगा लढतीत मेस्सीव्यतिरिक्त बार्सिलोनाच्या एंटोइन ग्रिजमानने सातव्या आणि लुईस सुआरेज याने 43 व्या मिनिटाला गोल नोंदवत आपल्या संघाचा शानदार विजय निश्चित केला.

युवेंटस्ची हंगामातील पहिली हार
बलाढय़ युवेंटस् संघाला ला लिगा हंगामातील यंदाचा पहिला पराभव शनिवारी स्वीकारावा लागला. रोनाल्डोच्या युवेंटस्ला इटलीच्या लाजियो संघाने 3-1 असे पराभूत केले. युवेंटस्च्या वतीने एकमेव गोल ख्रिस्तियानो रोनाल्डोने नोंदवला. लाजिओच्या वतीने लुईज फेलिपे रामोस मिर्ची आणि फेलिपे कैसेडो यांनी 1-1 गोल नोंदवला.

माझे वय आता 32 झाले आहे. निवृत्तीची वेळ जवळ आल्याची कुणकुण मला लागली आहे. म्हणूनच प्रत्येक स्पर्धेतील लढत अधिकाधिक आनंदाने साजरी करण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. त्यातूनच माझ्याकडून नवनवे विक्रम साकारले जाताहेत.
– लिओनेल मेस्सी, अर्जेंटिनाचा सुपरस्टार फुटबॉलपटू

आपली प्रतिक्रिया द्या