अंधश्रद्धेपोटी उंटाची मान कापून घराबाहेर पुरली, राजस्थानातील भयंकर प्रकार

उदयपूर हे राजस्थानातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. इथे विदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणात येत असतात. हे जगप्रसिद्ध शहर एका अघोरी प्रकारामुळे चर्चेत आलं आहे. अंधश्रद्धेपोटी इथे एका उंटाला ठार मारण्यात आलं आहे. या उंटाची मान कापून ती आरोपीने त्याच्या घराबाहेर पुरली. सूरजपोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत उंटाचं धड सापडलं होतं. पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेत 4 आरोपींना अटक केली आहे.

हा सगळा प्रकार अंदश्रद्धेतून घडल्याची माहिती पोलीस अधिकारी हनुमंत राजपुरोहित यांनी दिली आहे. वाईट गोष्टींचे सावट, संकटे दूर व्हावीत यासाठी आरोपींनी हा हिंस्त्र प्रकार केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 21 मे रोजी आरोपींनी उंटाचा गळा चिरून त्याला ठार मारलं होतं. राजेश अहीर, शोभालाल, चेतन आणि रघुवीर सिंह या चौघांना पोलिसांनी उंटाला ठार मारल्याप्रकरणी अटक केली आहे.

राजेश अहीर याचा दुधाचा व्यवसाय आहे. गेल्या काही दिवसांपासून तो त्रस्त होता. राजेशकडे 12 गाई असून त्यातील एक गाय काही दिवसांपासून आजारी पडली होती. आजारी असल्याने ती दूधही कमी देत होती. ही बाब समजल्याने चेतन नावाच्या एका तरुणाने राजेशला तुझ्यावर वाईट गोष्टींचं सावट आल्याचं सांगून घाबरवलं होतं. आपले वडील यापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुला मदत करतील असं सांगून चेतनने राजेशची शोभालाल यांच्याशी भेट घालून दिली.

शोभालाल यांनी राजेशला उंटाची मान कापून घराबाहेर पुरल्यास तुझ्या समस्या दूर होतील असं सांगितलं. हा सल्ला पटल्याने राजेशने चेतन आणि रघुनाथ नावाच्या मित्राच्या मदतीने टेकरी भागात एक उंट शोधला. राजेशने या उंटाला आधी चारा आणि गूळ खायला घातला आणि नंतर त्याची मान धडावेगळी केली. ही मान शोभालालने सांगितल्याप्रमाणे त्याने घराबाहेर पुरली. उंटाचे शिर नसलेले धड पाहून काही नागरिकांनी पोलिसांना कळवलं होतं. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही दृश्ये आणि खबऱ्यांच्या मदतीने आरोपी शोधून काढत त्यांना अटक केली.

मालकानं विकलं, पण उंटाने इमान राखलं! 100 किलोमीटरचा खडतर प्रवास करून घर गाठलं

प्राण्यांचे आपल्या मालकावर खूप प्रेम असतं. मालकांपासून ते दूर राहायला तयार नसतात. याचं उदाहरण मंगोलियाच्या बयांन्नूर येथे बघायला मिळालं होतं. म्हातारा झाला म्हणून एका उंटाला त्याच्या मालकाने दुसऱ्याला विकलं, पण त्या मुक्या जनावराची माया जराही कमी झाली नाही. उंटाने इमान राखत तब्बल 100 किलोमीटरचा अखंड प्रवास केला, अंगावर अनंत जखमा झेलल्या आणि तो आपल्या जुन्या मालकाकडे परतला.

एका शेतकरी दाम्पत्याने नऊ महिन्यांपूर्वी म्हाताऱ्या उंटाला विकलं होतं. मात्र नव्या मालकाकडे उंटाचं मन रमत नव्हतं. त्याने आपल्या पहिल्या मालकाकडे परत जायचं ठरवलं. झाडं झुडपे, काटेरी जंगल, वाळवंट, हायवे असं दरमजल करत 100 किलोमीटरचं अंतर उंटाने सात दिवसांत पार केलं आणि पहिल्या मालकाकडे पोचला. या प्रवासात त्याच्या पाठीवर खूप जखमा झाल्या, तो खूप थकला, पण त्याने आपला निर्धार सोडला नाही. अखेर एका गुराख्याने या उंटाला प्रवासात ओळखले आणि त्याच्या पहिल्या मालकाच्या घरी आणून सोडले. उंटाला बघून मालकाच्या डोळ्यांत अश्रू तराळले.

उंटाचा संघर्षमय प्रवास समजल्यानंतर जुन्या मालकाने त्याच्या खरेदीदाराला शोधून पुन्हा उंटाला विकत घेतलं. त्या बदल्यात खरेदीदाराला दुसरा उंट दिला. या घटनेनंतर उंटाला मंगोलियाचा पारंपरिक स्कार्फ ‘हाडा’ने सजवण्यात आलं. हा स्कार्फ ज्याच्या गळय़ाला बांधतात, तो कुटुंबाचा सदस्य समजला जातो. आता उंटाला कधी विकणार नाही, असा निर्णय या शेतकरी दांपत्याने केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या