गर्भात व्यंग असेल आणि आईच्या जीवाला धोका असेल तर गर्भपाताला परवानगी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गर्भात व्यंग असेल आणि आईच्या जीवाला धोका असेल तर गर्भपात करण्यासाठी परवानगी मिळू शकते. मुंबईमध्ये एका २४ आठवड्यांच्या गरदोर महिलेला याच कारणांचा आधार घेत सर्वोच्च न्यायालयाने गर्भपात करण्यासाठी परवानगी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मुंबईत राहणाऱ्या एका २३ वर्षीय महिलेला गर्भपातासाठी परवानगी देताना विशिष्ट कारणांचा आधार घेत ऐतिहासिक आदेश दिला आहे. गरोदर महिलेने आपल्या याचिकेत २४ आठवड्यांची गरोदर असल्याचे सांगतानाच २१ आठवड्यांनंतर केलेल्या वैद्यकीय परीक्षणात गर्भाला शिर नसल्याचे आढळल्याचे नमूद केले आहे. गर्भाविषयीची माहिती देऊन गरोदर महिलेने गर्भपाताची परवानगी मागितली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबईच्या केईएम रुग्णालयाने महिलेची तपासणी करुन अहवाल सादर केला. हा अहवाल पाहून गर्भातील व्यंग आणि आईच्या जीवाला असलेला धोका यांचा विचार करुन सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताला परवानगी दिली. परवानगी देताना सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय पथकाला गरोदर महिलेशी संबंधित सर्व वैद्यकीय अहवाल सांभाळून ठेवण्याचे तसेच मागितल्यास सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याआधी केंद्र सरकारनेही विशेष परिस्थितीचा विचार करुन संबंधित महिलेला गर्भपातासाठी परवानगी द्यावी अशा स्वरुपाची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली होती.

वैद्यकीय कारणासाठी केलेल्या गर्भपाताच्या कायद्यानुसार २० आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही. पण गर्भात आढळलेले व्यंग आणि आईच्या जीवाला असलेला धोका याची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने २४ आठवड्यांच्या गरदोर महिलेला गर्भपातासाठी परवानगी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या